ऑनलाइन लोकमत
झ्युरिच, दि. २१ - फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष मायकल प्लाटिनी यांच्यावर फिफाच्या नैतिकता समितीने आठ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे पुढची आठवर्ष या दोघांना फिफाच्या कारभारापासून दूर रहावे लागणार आहे.
२०११ मध्ये फिफाने प्लाटिनी यांना वीस लाख स्विस फ्रॅन्क दिल्या प्रकरणी ऑक्टोंबर मध्ये दोघांना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. फिफाची नैतिकता समिती या प्रकरणाचा तपास करत होती. दोघांनी कुठलाही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले होते.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्लाटर यांचे फिफावरील १७ वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर प्लसाटिनी यांच्याकडे त्या पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण या कारवाईमुळे प्लाटिनीही या स्पर्धेतून बाद झाले आहेत. आपल्या काळातील फ्रान्सचे सर्वोत्तम खेळाडू असणारे प्लाटिनी २००२ पासून यूईएफएचे अध्यक्ष होते.