अमेरिकेत जोनास या हिमवादळाने कहर केला असून यातील बळींची संख्या ३० वर पोहोचली आहे. या वादळाने अमेरिकेतील १२ राज्यांना तडाखा दिला. साडेआठ कोटी नागरिकांना या वादळाचा फटका बसला. या वादळासंदर्भातली माहिती लोकमतच्या वाचकांसाठी दिली आहे न्यू जर्सीमध्ये अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या माधव कामत यांनी:
जोनासची माहिती
या हिमवादळाचं नाव आहे जोनास. अमेरिकेच्या पूर्व किना-याला या वादळानं पूर्ण व्यापलं. न्यूयॉर्कचा विचार केला तर आजतागायतच्या इतिहासातला ही दुस-या क्रमांकाची हिमवृष्टी होती. सुमारे ७५ मैल प्रति तास वेगाने रोरावणा-या वा-यांनी किनारी भागामध्ये पूर आणले. या पूरासोबतच विक्रमी हिमवर्षावानं उंच लाटा आणल्या आणि शहराची मलनि:सारण व्यवस्था बंद पाडली. अर्थात, हा उत्पात आठवड्याच्या अखेरीस झाला ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. न्यू जर्सीमध्ये शनिवारी सकाळी हिनवादळ सुरू झालं आणि रविवारी सकाळी ते शमलं. जवळपास २० इंचाचा बर्फाचा थर सगळीकडे साचला होता. अर्थात, या वादळाचा मुकाबला करण्यासाठी सगळेजण सज्ज होते, कारण हवामानखात्याची अद्ययावत यंत्रणा सॅटेलाइटच्या माध्यमातून वादळाचा मागोवा घेत होती, आणि सगळी माहिती संपर्कयंत्रणेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत होती.
केंद्र तसेच राज्य सरकारनं आणिबाणी जाहीर केली, याचा अर्थ अत्यावश्यक सेवा आणि बचावकार्य वगळलं तर कुणीही घराबाहेर पडू नये अशी सूचना. शाळा, महाविद्यालये आणि सगळी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. बर्फ साफ करण्यासाठी शेकडो ट्रक्स लागले होते, परंतु रस्त्यावर आडकाठी करेल अशी एकही कार नव्हती. त्यामुळे मिठाचा मारा करणं आणि बर्फ साफ करणं सुलभ होत होतं.
या मोसमातलं हे पहिलंच वादळ असल्यामुळे राज्य सरकारकडे मिठाचा प्रचंड साठा होता, ज्याच्या सहाय्याने बर्फ वितळवणं सोपं गेलं. वार्षिक अर्थसंकल्पात यासाठी चांगलीच तरतूद केलेली असल्यामुळे आर्थिक बोजाही पडला नाही.
मी काय केलं?
शुक्रवारी संध्याकाळी मी घरी गेलो. आमच्याकडे आपत्कालिन स्थितीत लागणारी सगळी उपकरणे होती. यामध्ये फ्लॅशलाइट्स, बॅटरी, दूध, अंडी, पाव, पाणी आदीचा समावेश होता. संपूर्ण शनिवार घरात बसून आम्ही काढला. खायचं, झोपायचं, वाचायचं आणि टिव्ही बघायचा हाच उद्योग होता. बाहेर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य होतं, जे खिडकीतून फारच सुंदर वाटत होतं.
माझ्याकडे बर्फ साफ करणारं साडेसहा हॉर्सपॉवरचं मशिन होतं. मग काय, मी जॅकेट, ग्लोव्हज वगैरे घातले आणि घराबाहेरचा बर्फ साफ करायला लागलो. बर्फाच्या खाली माझ्या दोन्ही गाड्या गाडल्या गेल्या होत्या. सुखा सुखा असलेल्या या बर्फाला मी साफ करायला लागलो आणि जवळपास सहा तासांनी गाड्या मोकळ्या केल्या. जर हे वेळीच केलं नाही तर पंचाईत होते. कारण नंतर सूर्यप्रकाश पडतो, काही बर्फ वितळतं आणि सूर्य गेला की ते पुन्हा गोठतं. हे पुन्हा गोठलेलं बर्फ काढणं कर्मकठीण असतं, त्यामुळे हा त्रास नंतर करू म्हणून ढकलून चालत नाही. वेळीच ही काळजी घेतल्यामुळे माझ्या गाड्या आता चांगल्या स्थितीत आहेत
आता स्थिती खूपच ठीक आहे. अर्थात, आत्ताही तापमान उणे १० डिग्री आहे आणि कडेकडेने बर्फ जमा झालेला आहे, परंतु मायबाप असलेला निसर्ग येत्या काही दिवसांमध्ये हा बर्फही वितळवेल आणि सगळं पूर्ववत होईल. रविवारी तर दुपारी मी ऑफिसलाही गेलो होतो.
एकूण परिस्थिती काय होती
- आणिबाणी जाहीर केल्यामुळे प्रत्येकाला काय होणार याची कल्पना होती.
- हिमवादळामुळे ३० जणांना प्राणांना मुकावं लागलं. हे मृत्यू अपघातामुळे झाले होते, थंडीमुळे नाही.
- सगळी सरकारी यंत्रणा अत्यंत शिस्तबद्धरीतीने काम करत होती.
- खासगी कंत्राटदासांसह, ज्या कुणाची काम करण्याची तयारी आहे, तो जादाचे पैसे कमावण्यासाठी पिकअप ट्रक घेऊन काम करू शकत होता.
- आपापल्या परीसराची साफसफाईची काळजी त्या त्या उद्योगांची किंवा खासगी घरमालकांची होती. त्यात कुचराई झाली तर नुकसान भरपाईच्या दाव्यांना तोंड द्यायची तयारी हवी, त्यामुळे कुणीही निसर्गाला दोष देत, साफसफाईमध्ये उगाच दिरंगाई नाही केली. शेवटी पैसा बोलतो.
- अमेरिकेत मानवाच्या आयुष्याला आणि त्यांच्या मालमत्तांना पूज्य मानून त्यांची किंमत राखली जाते असं लक्षात येतं. त्यांचं संरक्षण करणं हे पवित्र कार्य मानलं जातं याचं प्रत्यंतर आलं.
- अर्थात, अशा आपत्कालात लोकं पैसाही कमावतात, परंतु ते कामही करतात हे महत्त्वाचं.
- शेवटी हा भांडवलशाही देश आहे. प्रत्येक संधीतून पैसे कमावणं, परंतु त्याच्या बदल्यात चोख सेवा पुरवणं याचा प्रत्यय आला.
- काही बागात अजूनही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही, परंतु वीज कंपन्या जोमानं काम करत आहेत, आणि लवकरच वीजपुरवटा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.