लंडन : पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध ठेवणऱ्या चीन सरकारचा निषेध करण्यासाठी बलोचिस्तानातील जनतेने लंडनमधील चीनच्या दुतावासासमोर आठवडाभर निदर्शने करण्याचे ठरवले असून, बलोचिस्तानातून चीनने बाहेर पडावे, अशी त्यांची महत्त्वाची मागणी आहे. बलोचींवर पाकिस्तानात होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी शनिवारपर्र्यत हे लोक दिवस-रात्र धरणे देणार आहेत.चीनचा राष्ट्रीय दिन १ आॅक्टोबर रोजी असून, तोपर्यंत आम्ही येथे निदर्शने करीत राहणार आहोत, असे (बलोचिस्तानमुक्ती चळवळ) फ्री बलोचिस्तान मुव्हमेंटतर्फे जाहीर करण्यात आले. बलोचिस्तानात चीन आणि पाकिस्तान यांच्या मैत्रीच्या संबंधांचा फटका आम्हाला बसत असत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. चीनचा बलोचिस्तानात प्रभाव वाढत चालला असल्याबद्दलही बलोची नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.चीन हा २१ व्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनी बनू पाहत आहे. चीन कोणतेही आंतरराष्ट्रीय कायदे व नियम पाळत नसून, व्हिएटनाम हे त्याचे उदाहरण आहे. चीनचा हा साम्राज्यवाद आम्हाला अजिबात मान्य नाही. पाकिस्ताननेही आंतरराष्ट्रीय कायदे व संकेतांचे उल्लंघन करून, बळजबरीने बलोचिस्तानचा प्रांत ताब्यात घेतला आहे, अशी बलोची जनतेची तक्रार आहे. (वृत्तसंस्था)
लंडनमधील चिनी दूतावासापुढे बलोच जनतेची निदर्शने
By admin | Published: September 27, 2016 1:51 AM