इस्लामाबाद : भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यास बंदी घालणाऱ्या विधेयकाला पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. भारतीय संसदेमध्ये सादर केलेल्या विधेयकांवरून आम्ही संयुक्त राष्ट्राकडे (युनो) ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या त्या विधेयकांना रोखून धरावे, असे आवाहन आम्ही केले आहे, असे पाकिस्तानने मंगळवारी सांगितले. ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे’ उल्लंघन करणारी अशी कृत्ये भारताने थांबवावीत, असे आवाहनही त्याने केले आहे. भारताच्या अधिकृत नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीरचा वादग्रस्त भाग हा भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे. वास्तविक असे दाखविणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या ठरावांचे उल्लंघन असून, प्रत्यक्षात चुकीचे व कायदेशीरदृष्ट्याही न टिकणारे आहे, असेही पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने आक्षेप फेटाळलाभारताच्या नकाशाबाबतचे विधेयक हा आमचा देशांतर्गत विषय असून, त्यात हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही. जो देशाचा अविभाज्य व वादातीत भाग आहे, तो देशाच्या नकाशात दाखवणे बंधनकारक करण्यासाठीच हे विधेयक मांडण्यात आले असून, त्याचा पाकिस्तानशी अजिबात संबंध नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारताचे नकाशासंबंधी विधेयक युनोने रोखावे
By admin | Published: May 18, 2016 4:14 AM