इस्लामाबाद : पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर आणि देशाची गुप्तचर संघटना आयएसआयवर टीका करणारा ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (२२) याची रविवारी रात्री येथे अज्ञात व्यक्तीने हत्या केली, असे सोमवारी पोलिसांनी सांगितले. बिलाल खान मित्रासोबत असताना त्याला फोन आला व एक जण त्याला जवळच्या जंगलात घेऊन गेला, असे पोलिसांनी सांगितल्याचा हवाला देऊन ‘डॉन’ने वृत्त दिले.बिलाल खानला टि्वटरवर १६ हजार, युट्यूब चॅनलवर ४८ हजार, तर फेसबुकवर २२ हजार फॉलोअर्स होते. खान याला मारण्यासाठी खंजीरचा उपयोग संशयिताने केला, असे पोलीस अधीक्षक सद्दार मलिक नईम म्हणाले. काही लोकांनी बंदुकीच्या गोळीचाही आवाज ऐकल्याचे ते म्हणाले. या घटनेत खान याचा मित्रही गंभीररीत्या जखमी झाला आहे.बिलाल खान हा समाजमाध्यमांवर जेवढा सक्रिय कार्यकर्ता होता तेवढाच तो मुक्त पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याची हत्या झाल्यानंतर न्याय मिळण्यासाठी लगेचच समाजमाध्यमांवर मोहीम सुरू करण्यात आली. अनेक टि्वटर यूजर्सनी बिलाल खान याची हत्या ही त्याने पाकिस्तानी लष्कर आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सवर केलेल्या टीकेचा परिणाम असल्याचे म्हटले. या घटनेमुळे लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचे बिलाल खानच्या वडिलांनी म्हटले.
पाकिस्तानात ब्लॉगरची भोसकून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:48 AM