News about Nimisha Priya, Yemen: केरळच्या निमिषा प्रिया फाशी प्रकरण सध्या देशात चर्चिले जात आहे. येमेनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या निमिषा प्रियाला येमेनच्या नागरिकांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रिया २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात असून, तिला वाचवण्यासाठी तिचे कटुंबीय धडपड करत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केरळमधील पलक्कडची रहिवाशी असलेली निमिषा प्रिया सध्या तुरुंगात आहे. तलाल अब्दो मेहदी या येमेनी नागरिकाच्या हत्या प्रकरणात तिली फाशीची शिक्षा झालेली आहे.
कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर निमिषा प्रियाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर २०२३ मध्ये येमेनमधील सर्वोच्च न्यायिक परिषदेकडेही याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर येमेनचे राष्ट्रपती राशद मोहम्मद अल अमीनी यांनी निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला मंजूरी दिली. त्यामुळे फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी निमिषासमोर 'ब्लड मनी' हा एकमेव पर्याय निमिषासमोर आहे.
ब्लड मनी काय?
येमेनमध्ये ब्लड मनी पद्धत आहे. म्हणजे हत्या प्रकरणातील व्यक्तीला झालेली शिक्षा झाली माफ होऊ शकते, फक्त त्याला मयताच्या कुटुंबीयांना ब्लड मनी द्यावा लागतात. म्हणजे मयताच्या कुटुंबाने नुकसान भरपाई म्हणून मागितलेली रक्कम!
तलाल अब्दो मेहदी याच्या कुटुंबाने २०२२ मध्ये ब्लड मनी म्हणून ५ करोड येमेनी रियाल इतकी रक्कम म्हणजे १.६ कोटी रुपये नुकसान भरपाई मागितली होती. निमिषा प्रियाच्या वकिलांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०,००० अमेरिकी डॉलर (३८ लाख रुपये) दोन हफ्त्यामध्ये तलालच्या कुटुंबीयांना दिले आहेत.
निमिषा प्रियाने तलाल अब्दो मेहदीची हत्या का केली?
निमिषा प्रिया येमेनला जाण्यापूर्वी केरळमध्ये राहत होती. तिचा टॉमी थॉमस यांच्यासोबत विवाह झाला होता. निमिषा येमेनला गेली. तिथे राजधानी सना येथील सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती.
त्यानंतर स्वतःचे रुग्णालय सुरू करण्याचे ठरवले. पण, परदेशी नागरिक येमेनमध्ये रुग्णालय सुरू करू शकत नाही. त्यामुळे तिथे तलाल अब्दो मेहदी यांच्यासोबत ओळख झाली. त्यासोबत भागीदारी करत तिने रुग्णालय सुरू केले.
रुग्णालय सुरू झाल्यानंतर तलाल अब्दो मेहदी हा निमिषा प्रियासोबत छेडछाड करू लागला. 2016 मध्ये एक दिवस निमिषा कॅशिअरकडे हिशोब मागायला गेली, तेव्हा त्याने सांगितले की, तुमचा पती (तलाल अब्दो मेहदी) सगळे पैसे घेऊन गेला आहे.
त्यानंतर समोर आले की, तलाल अब्दो मेहदी हा सगळ्यांना निमिषा माझी पत्नी असल्याचे सांगत आहे. त्याने बनावट कागदपत्रेही तयार केली होती. त्या कागदपत्रांवर लिहिलेले होते की, निमिषा त्याची पत्नी आहे. ही सगळी माहिती निमिषाला कळली.
तलाल द्यायचा निमिषाला त्रास
दरम्यान, तलाल अधूनमधून दारू प्यायचा आणि रुग्णालयात यायचा. निमिषाला त्रास द्यायचा. निमिषाने याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दोघांनीही कोठडीत पाठवले. नंतर दोघेही सुटले. पण, तलालचे वाईट वागणे सुरूच होते. तो निमिषावर बंधने घालू लागला. मारहाण करायचा.
२०१६ मध्ये निमिषाचा व्हिसा संपला. स्थानिक नागरिकाने हमी दिली, तरच व्हिसाचे नुतनीकरण शक्य असते. याच निमित्ताने तलालने निमिषाचा पासपोर्ट घेतला. त्यानंतर निमिषाला त्रास देणं वाढलं. मित्रांनाही निमिषाच्या घरी घेऊन यायचा आणि त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला.
तलाल निमिषाच्या घरी ड्रग्जही घ्यायचा. एक दिवस तो निमिषाच्या घरी ड्रग्ज घेत होता. त्यावेळी निमिषाने त्याला नशेचं इंजेक्शन दिले. पण, त्याचा ओव्हरडोज झाला आणि तलाल जमिनीवर पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
तलालच्या हत्येबद्दल कळू नये म्हणून निमिषाने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने तलालच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले. नंतर हे सगळे प्रकरण समोर आले. या प्रकरणात तिची मैत्रीण हनान हिला आजन्म कारावासाची शिक्षा झाली, तर निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २०२० मध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली होती.