८० प्रवाशांना स्पेनला घेऊन जाणारी एक बोट मोरक्कोजवळ उलटली, ज्यामध्ये ४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० हून अधिक लोक बुडाले असल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे.
मोरक्को अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी बोट उलटल्यानंतर ३६ जणांना वाचवलं होतं, जी बोट २ जानेवारी रोजी मॉरिटानियाहून ८६ प्रवाशांना घेऊन निघाली होती. त्यात ६६ पाकिस्तानी होते. वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओ हेलेना मालेनो यांनी एक्स वर सांगितलं की, बुडालेल्यांपैकी ४४ जण पाकिस्तानचे असल्याचं मानलं जातं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, मोरक्कोमधील त्यांचे दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. राबत (मोरोक्को) येथील आमच्या दूतावासाने आम्हाला कळवलं आहे की, मॉरिटानियाहून ८० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक आहेत, ती मोरक्कोमधील दखला बंदराजवळ उलटली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांना सुविधा देण्यासाठी आणि आवश्यक मदत पुरवण्यासाठी दूतावासाची एक टीम दखला येथे पाठवण्यात आली आहे, तर परराष्ट्र मंत्रालयातील संकट व्यवस्थापन युनिट सक्रिय करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संबंधित सरकारी संस्थांना पाकिस्तानी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.