मृतांचा आकडा ७,५०० पार : बौद्ध स्तूप, मंदिरांमध्ये चोरीच्या शक्यतेने नेपाळ हादरलेकाठमांडू : २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एव्हरेस्ट शिखरावर झालेल्या मोठ्या हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १०० गिर्यारोहकांचे मृतदेह नेपाळ पोलीस आणि पुनर्वसनाच्या कामात गुंतलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहेत. काठमांडूच्या उत्तरेकडे ६० किमीवर असणाऱ्या लांगतांग येथे रविवारी हे मृतदेह सापडले. यातील फक्त दोघांची ओळख पटली आहे.हे गाव गिर्यारोहकांच्या वहिवाटीवरचे आहे. या गावात गिर्यारोहकांसाठी ५५ गेस्ट हाऊस तसेच इतर सुविधा होत्या़ एव्हरेस्टवर कोसळलेल्या बर्फाच्या दरडीखाली हे संपूर्ण गाव गडप झाले आहे. बर्फात गाडले गेलेले अजून काही मृतदेह मिळतात काय हे पाहण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक व नेपाळी पोलीस बर्फात सहा फूट खोदत आहेत. पाऊस व ढगाळ हवामानामुळे आम्ही या भागात आधी पोहोचू शकलो नाही, असे लांगतांगचे सहायक जिल्हाधिकारी गौतम रिमल यांनी सांगितले.
गिर्यारोहकांचे पथक माघारी पहिल्या भारतीयाने माउंट एव्हरेस्ट सर केले, त्या अपूर्व घटनेच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने या जगातील सर्वोच्च शिखराच्या चढाई मोहिमेवर गेलेल्या भारतीय लष्कराच्या ३० गिर्यारोहकांच्या पथकाला नेपाळमधील भूकंपामुळे माघारी बोलावण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.भूकंपाच्या धक्क्यानंतर मदतीसाठी आलेली परदेशी पथके आता परतू लागली असून, नेपाळचे पोलीस व लष्कराने भूकंपानंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमाचा ताबा घेतला आहे. भूकंपामुळे विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे अवघड काम आता नेपाळी पोलीस व लष्कराला करायचे आहे. नेपाळमधील मृतांची संख्या आता ७,५५७ पर्यंत पोहोचली असून, त्यात ४१ भारतीय आहेत.नेपाळमध्ये महामारीची भीतीमोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असली तरी अजूनही काही मृतदेह नेपाळच्या ग्रामीण भागात ठिगाऱ्यांखाली अडकले असल्याची शक्यता नेपाळी बचाव पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उरलेले ढिगारे उपसण्याचे आव्हान या यंत्रणांसमोर आहे. हे लवकर न झाल्यास नेपाळमध्ये महामारी पसरण्याचा मोठा धोका आहे.अडीच कोटी आणि १०५ वर्षांचा नागरिककाठमांडूच्या बँक आॅफ काठमांडूचा काही भाग देखील भूकंपात कोसळला होता. या ढिगाऱ्याखालून मदतकार्य करणाऱ्या पथकाने तब्बल अडीच कोटी रुपये बाहेर काढले आहेत. तर नेपाळ पोलिसांनी तब्बल नऊ दिवसांनंतर एका १०५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली आहे.