वॉशिंग्टन: पृथ्वीप्रमाणेच परग्रहांवरही जीवसृष्टी आहे तसेच आकाशातील उडत्या तबकड्यांच्या (यूएफओ) पायलटचे मृतदेह अमेरिकी गुप्तचर खात्याच्या ताब्यात आहेत, असा दावा त्या देशाच्या हवाई दलातील माजी वैमानिक डेव्हिड चार्ल्स ग्रश यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, यूएफओच्या पायलटचे मृतदेह तसेच यूएफओचे अवशेष अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी नीट जपून ठेवले आहेत. अमेरिकी शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करत आहेत. या यूएफओच्या अवशेषांतून अतिशय निराळी शस्त्रे बनविता येतील का याचे अमेरिकेत प्रयोग सुरू असल्याचा दावा डेव्हिड चार्ल्स ग्रेश यांनी केला. मात्र त्यासंदर्भातील कोणतेही पुरावे त्यांनी दिले नाहीत. अवकाशात यूएफओ पाहिल्याचे अनेक जण सांगतात, मात्र त्याबाबतचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत कोणीही सादर केलेले नाहीत.
यूएफओ रहस्य अमेरिकेने आता जगासमोर उलगडून दाखवावे, असे आवाहनही माजी वैमानिक डेव्हिड चार्ल्स ग्रश यांनी केले आहे. अमेरिकी हवाई दलाच्या यूएफओ विभागामध्ये त्यांनी गुप्तचर अधिकारी म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची जगभरातील शास्त्रज्ञ, सामान्य नागरिक, प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे. (वृत्तसंस्था)