न्यूयॉर्क - गेल्या वर्षभरात झालेल्या बोईंग कंपनीच्या दोन 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातांमुळे या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, या विमानांची निर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीने या विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना आणि समुदायांना 10 कोटी डॉलर (सुमारे) 689 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ही रक्कम पुढील वर्षांसाठी प्राथमिक स्वरूपाची असेल. त्याबरोबरच इथिओपियन एअललाइन्स आणि लायन एअरद्वारे चालवण्यात येणाऱ्या 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील लोकांच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थानिक सरकारे आणि अशासकीय संघटनांसोबत काम करण्यात येईल असेही बोईंग कंपनीने सांगितले. या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी बोइंग कंपनीवर खटला दाखल केलेला आहे. गेल्यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी लायन एअरच्या 610 बोईंग 737 विमानाला इंडोनेशियातील जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर 13 मिनिटांनंतर हे विमान अपघातग्रस्त झाले होते. यात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी 10 मार्च रोजी इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला होता. यात 157 जणांचा मृत्यू झाला होता. सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या दोन अपघातांमुळे बोइंग कंपनीच्या मॅक्स 737 या विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना बोईंग देणार 689 कोटींची नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:42 PM