ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - प्रसिद्ध पॉप गायिका अरियाना ग्रँडने तिच्या पॉप कॉन्सर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मी मनातून पार कोसळून गेलेय, मी तुमची माफी मागते. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीयत अशा शब्दात अरियानाने तिच्या टि्वटर अकांउटवर आपले दु:ख व्यक्त केले.
सोमवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात होणा-या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला असून, 50 जण जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून त्या दिशेनेचे आम्ही तपास करतोय असे ग्रेट मँचेस्टर पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे.
अरियानाचा युरोप टूर तूर्तास रद्द
इंग्लंडच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अरियानाने तिचा वर्ल्ड टूर स्थगित केला आहे. गुरुवारी लंडनमध्येही अरियाना परफॉर्म करणार नसून, तिने तिचा संपूर्ण युरोप टूर स्थगित केला आहे. इंग्लंड, बेल्जियम, पोलंड, जर्मनी आणि स्विसमध्ये तिच्या कॉन्सर्ट होणार होत्या.
2005 च्या लंडन बॉम्बस्फोटानंतरचा हा सर्वात वाईट दहशतवादी हल्ला आहे. त्यावेळी कटाच्या सूत्रधारांसह 50 जण ठार झाले होते. मँचेस्टर येथे कार्यक्रमस्थळाच्या बाहेर रात्री 10.30 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला अशी माहिती मँचेस्ट एरिनाच्या अधिका-यांनी दिली. स्फोटाचा आवाज होताच घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरु झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अमेरिकन गायिका अरियाना ग्रँण्डचा म्युझिकल कॉन्सर्टला 21 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता होती. म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भाग घेतलेल्या एकाने स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, स्फोटानंतर सर्वजण मोठ-मोठ्याने ओरडत धावत होते. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. स्फोटाचा परिसर धूराने व्यपला होता आणि विचित्र असा जळण्याचा वास येत होता. बॉम्बस्फोटानंतर मँचेस्टर विक्टोरिया स्टेशन वरुन जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या.
दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुद्वाराकडून मदतीचा हातbroken. from the bottom of my heart, i am so so sorry. i don"t have words.— Ariana Grande (@ArianaGrande) May 23, 2017
मॅन्चेस्टर येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पीडित आणि गरजूंच्या मदतीसाठी गुरुद्वाराने पुढाकार घेतला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तसंच मदतीसाठी धावाधाव करत असलेल्यांना गुरुद्वाराने आसरा दिला आहे. हरजिंदर सिंग यांनी ट्विट करत परिसरातील चार गुरुद्वारांचा पत्ता दिला आहे. जेणेकरुन त्यांचा शोध घेणं सोपं जाईल. हरजिंदर सिंग यांनी ट्विट करत, गुरुद्वारा सर्वांसाठी खुला असून जेवण आणि राहण्याची सोय केली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच परिसरातील नागरिकांनीही ट्विटरच्या माध्यमातून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.