काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे. या बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारनिमित्त मशिदीत नमाज पठण करण्यासाठी अनेक जण आले असताच मशिदीच्या बाहेर हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे.मशिदीच्या बाहेर 1 हजार मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांनी दिली आहे. दहशतवाद्यानं भ्याड हल्ला केल्याचं शिया मशिदीच्या पाद-यानं म्हटलं आहे. अजूनपर्यंत या दहशतवादी हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले होते. स्टेडियममध्ये टी 20 सामना सुरू असताना हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सामना थांबवण्यात आला होता. अफगाणिस्तानचा टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, काबूलमधील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर दहशतवाद्याने हल्ला घडवून आणला होता. यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते.
काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 5:31 PM