अंकारा : तुर्कीत पोलिस ठाण्याला लक्ष्य करुन केलेल्या दोन कार बॉम्ब स्फोटात सहा जण ठार तर १२० पेक्षा अधिक नागरीक जखमी झाले आहेत. हे बॉम्ब स्फोट दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणण्यात आले. जखमींमध्ये २० पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व भागात वान येथे एका पोलिस ठाण्याला लक्ष्य करण्यात आले. कारच्या या बॉम्बस्फोटात एका पोलिस अधिकाऱ्यासह अन्य दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर २० पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य नागरीक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी किंवा पीकेके असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गत आठवड्यातच पीकेकेचा कमांडर जमील बायिक याने तुर्की शहरात पोलिसांविरुद्ध असे हल्ले करण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पूर्व तुर्कीच्या एलाजिग शहरात गुरुवारी सकाळी पोलिस मुख्यालयावर आणखी एक कार बॉम्बने हल्ला करण्यात आला. यात तीन पोलिस अधिकारी ठार झाले. तर १०० जण जखमी झाले. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरण? गतवर्षीची शांतता प्रक्रिया बंद झाल्यानंतर पीकेके आणि तुर्कीच्या सुरक्षा दलात संघर्ष सुरु झाला आहे. यात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक सुरक्षारक्षक आणि हजारो पीकेके अतिरेकी मारले गेले आहेत. यात शेकडो नागरिकांचा बळी गेल्याचा दावा मानवाधिकार संघटनांनी केला आहे. १९८४ मध्ये पीकेकेने दक्षिण पूर्व तुर्कीत स्वायत्ततेसाठी हत्यार हाती घेतले. या संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.
तुर्कीत बॉम्बस्फोट
By admin | Published: August 19, 2016 12:57 AM