काबूल : अफगाणिस्तानची राजधानी प्रचंड शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोटाने बुधवारी सकाळी हादरली. या हल्ल्यात ८० लोक ठार, तर शेकडो जखमी झाले. स्फोट झाला त्या भागात भारतासह अनेक देशांचे दूतावास आहेत. सुदैवाने भारताचा एकही कर्मचारी जखमी झाला नाही. घटनास्थळी चोहीकडे रक्तामांसाचा सडा पडला होता. स्फोट एवढा भयंकर होता की, दूरदूरपर्यंत घरे आणि इमारतींना हादरे बसून खिडक्यांच्या काचा फुटल्या. शाळकरी मुली आणि स्फोटातून बचावलेले जखमी लोक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धावू लागल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. ढिगारे उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली मृतदेह असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. आत्मघाती हल्लेखोराने झाम्बाक चौकात सकाळी साडेआठ वाजता स्फोटके लादलेल्या ट्रकचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यात आपला हात नसल्याचे टष्ट्वीट तालिबानने केले आहे. या हल्ल्याचा निषेध करतो, असेही या संघटनेने म्हटले. बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपनेही स्वीकारलेली नाही.स्फोटाने जपानी दूतावासातील खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. फ्रान्स आणि जर्मनीच्या दूतावासांचे नुकसान झाले, जीवितहानीचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)ंभारतीय दूतावासापासून १०० मीटरवर हा स्फोट झाला, असे भारताचे अफगाणिस्तानातील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी सांगितले. आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. स्फोट प्रचंड होता. आमच्या इमारतीसह आसपासच्या इमारतींचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर काबूलमधील हल्ल्याचा निषेध केला आहे.
बॉम्बस्फोटाने काबूल हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2017 4:09 AM