जलालाबाद : नाटो दलाच्या ताफ्यावरील आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्यासह विविध बॉम्बहल्ल्यांनी शुक्रवारी अफगाणिस्तान हादरून गेला. यात १५ जण ठार झाले. तालिबानने नाटोच्या ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघाती कारबॉम्बहल्ल्यात तीन नागरिक ठार, तर इतर चार जण जखमी झाले. जलालाबादमधील विमानतळानजीक आज सकाळी हा हल्ला झाला. गझनी प्रांतात मिनी व्हॅन रस्त्याच्या कडेला पेरलेल्या बॉम्बच्या तडाख्यात सापडून १२ नागरिकांचा बळी गेला. अमेरिकेने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने सरकार व विदेशी सैन्यावरील हल्ले वाढविले आहेत. गझनीत झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. तथापि, नाटोच्या ताफ्यावरील हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. तालिबानने गुरुवारी मझार-ए-शरीफ शहरात न्यायालय संकुलावर केलेल्या हल्ल्यात १८ जणांचा बळी गेला होता. दहशतवादी सहा तास या संकुलात थैमान घालत होते. राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी या हल्ल्याची निर्भत्सना करणारे निवेदन जारी केले आहे. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानात बॉम्बहल्ले; १५ ठार
By admin | Published: April 11, 2015 12:53 AM