काबूल - वाईटाचा परिणाम वाईटच होतो, असे म्हटले जाते, असाच काहीसा प्रकार अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांसोबत घडला आहे. आफगाणिस्तानमधील एका मशिदीमध्ये बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना हा वर्ग खूप महागात पडला. या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या स्फोटात ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानच्या लष्कराने याबाबतची माहिती देताना सांगितले की, या प्रशिक्षणादरम्यान ६ परदेशी दहशतवाद्यांसह एकूण ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.स्फोटात ठार झालेले दहशतवादी हे भूसुरुंग तयार करण्यातले तज्ज्ञ होते आणि शनिवारी ते २६ अन्य दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे लाइव्ह प्रशिक्षण देत होते. हा स्फोट बाल्फ प्रांतातील दौलताबाद जिल्ह्यातील कुल्ताक गावात झाला होता. अफगाण लष्कराने एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, या स्फोटात ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.खम्मा प्रेसच्या रिपोर्टनुसार हे तालिबानी दहशतवादी एका मशिदीमध्ये जमले होते. तिथे त्यांना बॉम्ब आणि आयईडी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.
बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण जीवावर बेतले, भीषण स्फोटात ३० दहशतवादी ठार झाले
By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 3:25 PM