शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:28 AM2022-07-13T10:28:20+5:302022-07-13T10:29:35+5:30

युलिया पेवस्का हे खरं तर रशियन फौजांनी पकडलेल्या  युक्रेनी डॉक्टरचं नाव आहे; पण सगळं युक्रेन त्यांना तायरा म्हणूनच ओळखतं.

Bomb planted with hidden cameras on body russia ukraine war doctor | शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब !

शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब !

googlenewsNext

युलिया पेवस्का हे खरं तर रशियन फौजांनी पकडलेल्या  युक्रेनी डॉक्टरचं नाव आहे; पण सगळं युक्रेन त्यांना तायरा म्हणूनच ओळखतं. ५३ वर्षांच्या या डॉक्टरबाई स्वतः युक्रेनी सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर आहेत. त्या आता सैन्यात असलेल्या डॉक्टर्सना प्रशिक्षण देतात आणि त्यामुळे त्या युक्रेनमध्ये चांगल्याच प्रसिद्ध आहेत.

रशियन फौजांनी पकडण्यापूर्वी त्यांनी एक अत्यंत कमाल काम केलं होतं.  युद्ध सुरू झाल्यापासून त्यांच्या बॉडीकॅममध्ये मारियूपोल शहरातल्या युद्धपरिस्थितीतल्या लोकांचं शूटिंग केलं होतं. त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्यांनी लोकांना शक्य तेवढी मदत केली होती.  त्यांनी केलेलं हे शूटिंग  तब्बल २५६ गिगाबाइट्स इतकं प्रचंड होतं. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात नेमकं काय चालू आहे, हे दाखवणारं हे फुटेज युक्रेनच्या बाहेर पाठवणं फार महत्त्वाचं होतं आणि त्याकामी त्यांना मदत केली ती असोसिएट प्रेसच्या वार्ताहरांनी. 

त्यांनी हे फुटेज बाहेर कसं आणलं? तर तायरानं त्यांना ते एका छोट्या मायक्रोचिपमध्ये घालून दिलं. ही मायक्रोचिप पत्रकारांनी एका टॅम्पूनमध्ये लपवली आणि एकूण १५ रशियन पोस्टस्मधून ती यशस्वीरीत्या देशाबाहेर काढली. ते पत्रकार १५ एप्रिलला युक्रेनमधून बाहेर पळाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तायराला रशियन फौजांनी अटक केली.

त्यापूर्वी काही तास रशियन फौजांनी मारियुपोल मधल्या सगळ्यात मोठ्या बॉम्ब शेल्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात शेकडो माणसं मरण पावली. त्यापाठोपाठ नेपच्यून पूल नावाचं बॉम्ब शेल्टरदेखील उद्ध्वस्त झालं. मारियुपोल शहरात पूर्णपणे हाहाकार माजला होता. तायराने तिच्या हॉस्पिटलच्या तळघरात लपलेल्या २० माणसांना एकत्र केलं. त्यात काही लहान मुलंदेखील होती. तिनं या सगळ्यांना एका बसमध्ये एकत्र केलं. तिला त्या सगळ्यांना दूर सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं होतं. शहराच्या सगळ्या सीमा रशियन फौजांनी सील केल्या होत्या. सीमेवरच्या रशियन सैनिकांनी तायराला ओळखलं. त्या म्हणतात, “त्यांनी मला बघितलं. ते पलीकडं गेले. त्यांनी काही फोन केले, ते परत आले. मग त्यांनी मला अटक केली.” त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पळून जाण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या अटकेनंतर सुरू झाले त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण तीन महिने! त्यांची रवानगी इतर २१ महिलांसह १० फूट बाय २० फूट आकाराच्या कोठडीत करण्यात आली. तिथे त्यांना मिळणाऱ्या एकूण वागणुकीबद्दल, अन्नाबद्दल त्या अतिशय जपून बोलतात आणि मोजूनमापून शब्द वापरतात. कारण आपल्याकडून एखादा शब्द कमी- जास्त बोलला गेला, तर त्यामुळं अजूनही अटकेत असलेल्या कैद्यांना वाईट वागणूक मिळेल, याची त्यांना काळजी वाटते.

त्या स्वतः अटकेत असताना त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप केले गेले. रशियन फौजांनी तायरावर मानवी अवयवांची तस्करी केल्याचाही आरोप लावला. तो आरोप फेटाळून लावताना त्या म्हणाल्या, “युद्धभूमीवर जिवंत, उपयोगाचे मानवी अवयव कुठून सापडतील? अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किती किचकट आणि अवघड असतात याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?” त्या म्हणतात, माझा मूळ स्वभाव अत्यंत हट्टी आहे. त्यात मी एखादी गोष्ट केलेली नसेल, तर तुम्ही माझ्याकडून त्याचा कबुलीजबाब घेऊ शकत नाही. मला गोळी घातलीत तरीही नाही.

 कैदेत जाण्यापूर्वी त्यांनी बाहेर पाठवलेल्या फुटेजमधून अनेक गोष्टी प्रत्यक्षात दिसल्या. त्यात हेही दिसलं की तायरा यांनी रशियन सैनिकांवरदेखील अत्यंत आत्मीयतेने उपचार केले होते आणि मग त्यांच्यावरच्या कुठल्याच आरोपाला काही अर्थ उरला नाही. जवळजवळ तीन महिन्यांनंतर त्यांची रशियन सैन्यानं सुटका केली; पण इतकं सगळं होऊनसुद्धा त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्या अजूनही तितक्याच उत्साही आहेत आणि पुढचं प्लॅनिंग करण्यात व्यग्र आहेत.

‘तुम्ही’ नक्की नरकात जाणार! 
तायरा यांना आता अनेक पत्रकार  विचारतात, “कैदेत असताना आपला मृत्यू होईल याची तुम्हाला भीती नाही वाटली का?” त्यावर त्या म्हणतात, ‘हा प्रश्न मला कैदेत असताना तिथल्या सैनिकांनी अनेकदा विचारला आणि दर वेळी मी त्यांना एकच उत्तर दिलं, अशी कुठलीच भीती मला वाटत नाही. कारण मी देवाच्या बाजूनं उभी आहे. तुम्ही मात्र नरकात जाणार आहात, यात काही शंका नाही.”

Web Title: Bomb planted with hidden cameras on body russia ukraine war doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.