तेल अवीव - आज संपूर्ण जगभरात मुस्लीम समाज ईद साजरी करत असताना, गाझातील लोकांवर अद्यापही बॉम्बचा वर्षाव सुरूच आहे. यात, डझनावर लोकांचा मृत्यू झाला आहे. खरेतर युद्धाच्या वातावरणात गाझातील लोकांची ही दुसरी ईद आहे. उत्तर गाझा पट्टीतील जबालिया येथे रमजान या पवित्र महिन्याच्या शेवटी ईद-उल-फित्रच्याच्या नमाजमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा फोटो आला आहे. यात ते, बॉम्बिंगमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मशिदींच्या अवशेशांवर नमाज पठण करताना दिसत आहेत. गाझातील हे लोक, बम्बिंगचा सामना तर करतच आहेत, शिवाय, मदतीत येणाऱ्या अडथळ्यांचाही सामना करत आहेत. दरम्यान, रविवारी सकाळपासून इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला सुरू आहे. इस्रायलने गाझाच्या रफाह परिसर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर, इस्रायल येथे मोठा हल्ला करण्याच्या भीतीही व्यक्त केली जात आहे.
इस्रायली सैन्याने सोमवारी रफाहमधील बहुतेक भाग रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. लष्कराने पॅलेस्टिनींना मुवासीकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश ईद-उल-फित्र दरम्यान देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलने इजिप्तच्या सीमेवरील रफाह येथे मोठी कारवाई सुरू केली. खरे तर, गाझाला बाह्य जगाशी जोडणारे हे एकमेव प्रवेशद्वार आहे. सध्या हमासच्या ताब्यात ५९ इस्रायली नागरिक ओलीस आहेत. यांपैकी २४ जिवंत असल्याचा अंदाज आहे. सर्व बंधक परत येईपर्यंत हल्ले सुरूच राहतील असे इस्रायलने म्हटले आहे.
हुथी बंडखोरांचे हल्ले -इराण समर्थित हुथी बंडखोरांनी रविवारी सकाळच्या सुमारास इस्रायलवर मिसाइल्स डागले. मात्र, आपण एअर डिफेन्सच्या सहाय्याने येमेनकडून येणारे मिसाइल्स रोखले, असे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायली संरक्षण दलाने एक्स अकाउंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे मध्य इस्रायलच्या बहुतेक भागांत सायरन वाजले. दरम्यान, आपण बेन गुरियन विमानतळावर मिसाइल हल्ला केल्याचे हुथींनी म्हटले आहे.