रशियाच्या ताब्यातील बाजारपेठेत बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू; युक्रेनच्या सैन्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:20 AM2024-01-22T10:20:35+5:302024-01-22T10:21:27+5:30
युक्रेनियन सैन्याने मात्र आरोप फेटाळले
Russia Ukraine War, bombing: रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. डोनेस्तक शहराच्या उपनगरातील टेकस्टिलश्चिकमध्ये रविवारी सकाळी हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डोनेस्तक येथे रशियाने नियुक्त केलेले सर्वोच्च अधिकारी डेनिस पुशिलिन यांनी सांगितले की, या हल्ल्यात २५ जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या लष्कराने हा बॉम्बहल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. पण या भागात उपस्थित असलेल्या युक्रेनच्या लष्करी गटाने हल्ल्याचा इन्कार केला आहे.
पुशिलिन म्हणाले की, आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. दरम्यान, स्थानिक अधिकार्यांनी सांगितले की, रविवारी रशियाच्या उस्ट-लुगा बंदरातील रासायनिक वाहतूक टर्मिनलमध्ये दोन स्फोट झाल्यानंतर आग लागली. स्थानिक मीडियाने सांगितले की बंदरावर युक्रेनियन ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे गॅस टाकीचा स्फोट झाला आणि आग लागली. रशियन स्थित किंगसेप प्रदेशातील बंदराचे प्रमुख युरी झाप्लात्स्की यांनी एका निवेदनात सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु जिल्ह्याला 'हाय अलर्ट' वर ठेवण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या समोरील रस्त्यावर मृतदेह पडल्याचे दिसून आले. एपीएफच्या अहवालानुसार, एका स्थानिक रहिवाशाने स्थानिक मीडियाला सांगितले की, त्याला रॉकेट डोक्यावरून जात असल्याचा आवाज आला. यानंतर ती मार्केटमधील स्टॉलखाली तो लपला. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धूर दिसू लागला.
युक्रेनियन सैन्याने दिला नकार
फेसबुकवर पोस्ट केलेल्या निवेदनात, युक्रेनियन सैन्याच्या तावरिया युनिटने सांगितले की त्यांचे सैन्य या ऑपरेशनमध्ये सामील नव्हते. त्यांनी पुढे लिहिले, 'डोनेस्तक हे युक्रेनमध्येच आहे! युक्रेनियन लोकांचा जीव गेला आहे त्यामुळे यासाठी रशियाला जबाबदार धरले पाहिजे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियाच्या शांतताप्रिय लोकांविरुद्ध युक्रेनच्या सैन्याने केलेले कृत्य दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. रशियाने सांगितले आहे की, हल्ल्यात अशी शस्त्रे वापरली गेली, जी पाश्चात्य देशांनी युक्रेनला दिली होती.