राजू नायक / ऑनलाइन लोकमत
पोर्तो ( पोर्तुगाल), दि. 4 - जेथे पुस्तके विकत घेऊन वाचण्याची मारामार तेथे पोर्तो शहरातील एक सर्वात जुने पुस्तकालय आत प्रवेश देण्यासाठीच 4 युरो म्हणजे जवळ जवळ 300 रुपये प्रवेश शुल्क आकारते असे सांगितले तर खरे वाटणार नाही.
या पुस्तक भांडाराचे नाव लेलो आणि इर्मांव असे असून लोनली प्लॅनेट ने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सुंदर ग्रंथदालन असे संबोधून त्याचा गौरव केला आहे. परंतु तेवढ्या साठीच ते लोकप्रिय नाही. त्याचे खरे कारण हॅरी पॉटरच्या जन्मकथेचा या बुकस्टोरशी संबंध आहे.
हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोवलिंग ह्यांचे पूर्वाश्रमीचे पतीला भेटण्यासाठी त्या ह्या बुकस्टोर मध्ये येत. सांगण्यात येते रोवलिंग ह्यांना हॅरी पॉटर लिहण्याची स्फुर्ती पोर्तो मध्येच , विशेषतः ह्या बुकस्टोरमधेच मिळाली.
1990 च्या काळात त्या पोर्तो मधेच 10 वर्षे काम करत व ह्या पुस्तकाळ्यातच बसून कॉफी पित असत. ह्या बुकस्टोर ची जिना व त्याची एकूणच रचना होगवॉर्डसच्या वर्णन असलेल्या- हॅरी पॉटर जेथे शिकत असलेल्या शाळेप्रमाणे आहे.
ह्या बुकस्टोर समोरच पोर्तो विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठात विध्यार्थी जो पेहराव - काळा सूट वा काळा कोट घालतात तोच लेखिकेने होगवॉर्डसच्या मुलांचा पोशाख म्हणून दाखवला आहे.
लोकमतच्या प्रतिनिधीने सोमवारी ह्या पुस्तक स्टोर ला भेट दिली तेव्हा आत मूला मुलींची झुम्मट उडाली होती. तीन दुकाने उलांडून मुले एके ठिकाणी 4 युरो शुल्क देऊन प्रवेश तिकीट खरेदी करून व रांगेत उभे रावून स्टोरमध्ये जात होते.
आतमध्ये हॅरी पॉटर पुस्तकाचे एक स्वतंत्र दालन आहे. स्टोरमध्ये पोर्तुगीज आणि इतर भाषांतील असंख्य पुस्तके आहेत. ह्या स्टोरमध्ये फिरणेच एक गमतीदार अनुभव असतो.