ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरील शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाहीय. आधीच पंतप्रधानपद सोडावे लागलेले असताना आता पार्टीगेट प्रकरणामुळे संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पंतप्रधानपदावर असताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून पार्टी केल्याबद्दल, संसदेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस संसद समितीने केली आहे. 58 वर्षीय जॉन्सन यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून कोविड साथीच्या काळात डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी केली होती. यावेळी संसदेची त्यांनी दिशाभूल केली होती, असा आरोप होता. विशेषाधिकार समितीकडून या प्रकरणावर गोपनीय पत्र मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी शुक्रवारी राजीनामा जाहीर केला.
आपली संसदेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जॉन्सन यांनी केला आहे. समितीने आतापर्यंत मी जाणूनबुजून किंवा बेपर्वाईने संसदेची दिशाभूल केल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही, असे ते म्हणाले. लॉकडाऊन दरम्यान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये आयोजित पार्ट्यांमध्ये लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप योग्य नाहीय. ते अत्यावश्यक कार्यक्रम होते, त्यामुळे त्याला परवानगी देण्यात आली. या वेळी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. या वर्षी मार्चमध्ये विशेषाधिकार समितीला दिलेल्या जबाबामध्ये जॉन्सन यांनी संसदेची दिशाभूल केल्याचे मान्य केले होते. मात्र, त्यांनी हे जाणूनबुजून केल्याचा इन्कार केला होता.