ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्यास नकार दिला आहे. तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक या पदासाठी विजयाच्या आणखी जवळ पोहोचले आहेत.
बोरिस जॉन्सन यांनी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, पुढील टप्प्यात नेतृत्व करण्यासाठी मला पुरेशा खासदारांचा पाठिंबा आहे, परंतु तो आघाडीचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यापेक्षा कमी आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांसह निवडणुकीत मी यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे, पण तसे करणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, गेल्या काही दिवसांत मी दु:खदपणे या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, संसदेत एकसंध पक्ष असल्याशिवाय तुम्ही प्रभावीपणे शासन करू शकत नाही, असे बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे 128 खासदार ऋषी सुनक यांना पाठिंबा देत आहेत, जे पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 च्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. तर बोरिस जॉन्सन यांना आतापर्यंत 100 खासदारांचे समर्थन मिळालेले नाही. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांच्या वक्तव्यामुळे ऋषी सुनक यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.
विशेष म्हणजे, काही काळ ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर ऋषी सुनक यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत राजीनामा दिला. त्यानंतर इतर खासदारही निघून गेले. अशा परिस्थितीत बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लिझ ट्रस नवीन पंतप्रधान बनल्या. मात्र, त्या जास्त काळ सरकार चालवू शकल्या नाहीत आणि मिनी बजेटमधील आर्थिक निर्णयांमुळे वादात सापडल्या आणि 45 दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा एकदा नव्या पंतप्रधानांसाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता निवडण्याची कसरत जोरात सुरू झाली आहे.
ट्रस यांना मिळू शकते तगडी पेन्शनलिझ ट्रस काही आठवडेच पंतप्रधानपदी राहिल्या; परंतु त्यांना तगडी पेन्शन मिळणार आहे. राजकीय सार्वजनिक जीवनातील दैनंदिनी जपण्यासाठी म्हणून त्यांना पब्लिक ड्युटी कॉस्ट अलाऊंस (पीडीसीए) अंतर्गत तब्बल 1 लाख 15 हजार ब्रिटिश पौंड मिळणार आहेत. ही योजना मागरिट थॅचर यांनी 1991 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक पंतप्रधानांनी या योजनेतून तगड़ी कमाई केली आहे.