लंडन : ब्रिटनमधील निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी मोठा विजय मिळविला आहे. १९८० च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विजयानंतर प्रथमच कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने संसदेत ३६३ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळविला आहे.
ब्रेक्झिटवरील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही नवी पहाट आहे, अशी प्रतिक्रिया जॉन्सन यांनी दिली आहे, तर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला आहे. विजय रॅलीत आपल्या महिला सहकारी कॅरी सायमंड यांच्या उपस्थितीत बोलताना जॉन्सन म्हणाले की, आम्ही करून दाखविले. आम्ही अडथळा पार केला आहे. यावेळी लोकांनी ‘बे्रक्झिट होणारच’ अशा घोषणा दिल्या.
जॉन्सन हे लवकरच बकिंघम येथे पॅलेसमध्ये जाऊन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेणार आहेत. जॉन्सन यांनी स्वत: लंडनच्या उक्सब्रिज आणि साऊथ रुइस्लिप येथून विजय मिळविला आहे. युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी हा मजबूत जनादेश असल्याचे ते यावेळी म्हणाले. हा केवळ बे्रक्झिटसाठी नव्हे, तर देशाला एकजूट करण्यासाठी लोकांचा कौल असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
लेबर पार्टीचे जेरेमी कॉर्बिन यांचा राजीनामा
या निवडणुकीत विरोधी पक्ष लेबर पार्टीला ६५० सदस्यांच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये केवळ २०३ जागा मिळाल्याआहेत. त्यानंतर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लेबर पार्टीसाठी निराश करणारे हे निकाल आहेत. मी भविष्यात कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व करणार नाही. काश्मिरात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या पक्षाची कथित भारतविरोधी प्रतिमा तयार झाली. यानंतर लेबर पार्टीसोबत राहणारे भारतीय वंशाचे लोक त्यांच्यापासून दूर गेले.