1. प्रश्न- आमचे मूल अमेरिकेत जन्मास आले, मात्र आता आम्ही भारतात राहात आहोत. आम्हाला आता मित्रांच्या घरी भेट देण्यासाठी अमेरिकेला जायचे आहे. माझ्या मुलाला आता अमेरिकन व्हीसा लागेल की तो अमेरिकेचा नागरिक आहे याबाबत माझ्या मनात स्पष्टता नाही, तुम्ही मला मदत कराल का?
उत्तर- काही अपवाद वगळता अमेरिकेत जन्मणाऱ्या मुलास अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या अमेरिकन नागरिकत्व असणाऱ्या मुलाला अमेरिकन पासपोर्टवर सर्वत्र प्रवास करावा लागेल. अमेरिकन पासपोर्टसाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports/ येथे भेट द्यावी.
(पासपोर्ट आणि अमेरिकन व्हिसा चोरीला गेल्यास काय करायचे?)
2. प्रश्न- माझे मूल अमेरिकेत जन्मले आणि त्याच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे. त्या पासपोर्टची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यासाठी आता काय करावे हे माहिती नाही. त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी आम्हाला पुन्हा अमेरिकेत जावे लागेल का?
उत्तर- तुमच्या मुलाचा पासपोर्टचे मुंबईतील अमेरिकन कौन्सुलेटमध्ये नूतनीकरण करता येईल. कृपया कौन्सुलेटच्या https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports/ संकेतस्थळावर भेट द्या. तुम्हाला पासपोर्ट अर्ज, दोन फोटो (अमेरिकन पासपोर्ट आकाराचे, भारतीय नव्हे) हे कौन्सुलेटमध्ये द्यावे लागेल. त्याचप्रमाणे पाल्याला व दोन्ही पालकांना कौन्सुलेटमध्ये मुलाखत द्यावी लागेल. जर दोन्ही पालकांना प्रत्यक्ष उपस्थित राहाणे अशक्य असेल तर कौन्सुलेटच्या संकेतस्थळावरील सूचनांची मदत घ्या. महत्त्वाचे- तुमच्या मुलाच्या पासपोर्ट अर्जावर कौन्सुलर अधिकाऱ्यांसमोर त्यांनी सांगेपर्यंत स्वाक्षरी करु नका.
3. प्रश्न- माझे आई-वडील अमेरिकेत शिकत असताना (किंवा नोकरी करत असताना) माझा अमेरिकेत जन्म झाला आणि मी अमेरिकन नागरिक आहे. आमची मुलेसुद्धा अमेरिकन नागरिक आहेत का? असा मला व माझ्या जोडीदाराला प्रश्न पडतो. तुम्ही याबद्दल सांगू शकाल का?
उत्तर -तुमची मुले अमेरिकन नागरिक असण्याची शक्यता आहे. मुलाच्या पालकांच्या नागरिक्त्वापेक्षाही काही अधिक मुद्द्यांचा अमेरिकन नागरिकत्व कायदा विचार करतो. अमेरिकन नागरिकत्त्व असणारे पालक अमेरिकेत किती काळ राहिले आणि त्यांची वैवाहिक स्थिती या मुद्द्यांचाही मुलांच्या नागरिकत्त्वासाठी विचार केला जातो.तुमचा मुलगा अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्यास पात्र आहे का? हे पाहाण्यासाठी आमच्या https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/citizenship-services/ या संकेतस्थळाला भेट द्या.