तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर त्या कंपनीतील बॉसचे वागणे कसे आहे, हे खूप महत्त्वाचे ठरते. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना समाधानी आणि आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखते. पण, काही कंपन्याचे बॉस असे आहेत, की जे कर्मचार्यांना आश्चर्यचकित किंवा सरप्राइज देण्यासाठी त्यांना अशा गोष्टी देतात, ज्याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एका कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना सरप्राइज दिले आहे. हे सरप्राइज समजल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. दरम्यान, बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील सूचना येईपर्यंत दर महिन्याला बोनस देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 19 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम पगारातून वेगळी दिली जाईल. 'द सन' नुसार, ब्रिटनमधील 4Com कंपनीच्या सर्व 431 कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या एनर्जी बिलांमध्ये मदत करण्यासाठी दरमहा 19,000 रुपये दिले जातील.
कंपनीच्या बॉसनेच मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांसमोर ही घोषणा केली. बॉसच्या या घोषणेमुळे कंपनीचे कर्मचारी खूप खूश आहेत. दरम्यान, 1999 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही कंपनी 4Com दूरसंचार उपकरणे पुरवते. ही कंपनी 2017 मध्ये 'द संडे टाइम्स'च्या 100 सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत शीर्षस्थानी होती. ही कंपनी सध्या नफ्यात चालली आहे, अशा परिस्थितीत बॉस गॅरी स्कट यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 19 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे.
'टीम आमची सर्वात मौल्यवान संपत्ती'बोनसची घोषणा करताना गॅरी म्हणाले की, याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत कंपनीच्या प्रत्येक व्यक्तीला पुढील सूचना मिळेपर्यंत दरमहा 18,909 रुपयांची वाढ मिळेल. आमचे प्राधान्य आमच्या टीमला पाठिंबा देण्याचे आहे, जे आम्ही अनेक वर्षांच्या मेहनतीतून तयार केले आहे. ही टीम आमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत. तसेच, आमची कंपनी 50 हून अधिक भूमिकांसह पुढे जात आहे. भविष्यातही आम्ही चांगले काम करू आणि आमच्या कर्मचाऱ्यांना महत्त्व देऊ, असेही गॅरी स्कट यांनी म्हटले आहे.