ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २४ - ' देव तारी त्याला कोण मारी?' ही म्हण अमेरिकेतील एका १९ वर्षांच्या तरूणाबाबत तंतोतंत खरी ठरली आहे आणि तेही तब्बल ३ वेळा... अमेरिकेतील उताहमध्ये राहणार मॅसन वेल्स हा १९ वर्षीय तरूण बोस्टन, पॅरिस आणि मंगळवारी ब्रसेल्समध्ये झालेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. देवाच्या कृपेनेच तो आज सुखरूपरित्या जिवंत आहे.
बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्समधील विमानतळावर झालेल्या हल्ल्यावेळी मॅसन वेल्स विमानतळापासून अगदी जवळ होता, त्यामुळे तो जखमी झाला मात्र त्याचा जीव अगदी थोडक्यात वाचला. यापूर्वी बोस्टन व पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यानही वेल्स तेथेच होता, मात्र नशिब बलवत्तर असल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही व त्याचा जीव धोक्यात सापडला नाही.
२०१३ साली एप्रिलमध्ये बोस्टन येथे मॅरेथॉनमध्ये बाँबहल्ला झाला होता, तेथे वेल्सची आई मॅरेथॉनसाठी आली होती. त्यावेळी वेल्सही वडिलांसोबत बोस्टनमध्ये होता आणि त्यांच्यापासून अवघ्या काही अंतरावरच प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने वेल्स व त्याचे वडील या स्फोटातून सुखरुप बचावले.
तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळेसही वेल्स शहरातच होता, मात्र तो शहराच्या दुस-या भागात असल्यामुळे त्याला काहीही दुखापत झाली नाही.
आणि मंगळवारी ब्रसेल्समधील स्फोटादरम्यान तर तो विमानतळाजवळच होता, यावेळी तो हल्ल्यात जखमी झाला खरा मात्र त्याचा जीव थोडक्यात वाचल्याने त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
‘ मॅसन तब्बल तीन वेळा हल्ल्यांमधून वाचला आहे. आमची आशा आहे की त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं आता संपली असतील’ अशी प्रतिक्रिया मॅसनचे वडील चॅड वेल्स यांनी दिली.