बैरूत : इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बकर अल बगदादी याच्या पत्नीपैकी एक सजा हमीद अल दुलैमी व तिचा मुलगा यांना लेबनॉनच्या लष्कराने अटक केल्याचे वृत्त असून, इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेटसाठी हा जबर धक्का आहे. लेबनॉनी वृत्तपत्र असलेल्या सफीरने दिलेल्या वृत्तानुसार सिरिया-लेबनॉन सीमेवर बगदादीची पत्नी व मुलाला बनावट कागदपत्रांसह अटक करण्यात आली. लेबनॉन संरक्षण मंत्रालयातर्फे तिची चौकशी करण्यात येत आहे. सिरिया- लेबनॉन सीमेवर प्रवेश करीत असताना या आई व मुलाला अटक झाली आहे. सिरियाचा मोठा भाग इसिसने गिळंकृत केला आहे. त्यामुळे लेबनॉनने आपल्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.इस्लामिक जिहादींनी आपल्या देशात येऊ नये याची खबरदारी लेबनॉन घेत आहे. लेबनॉन सरकारने सिरिया सीमेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इस्लामिक स्टेटच्या अनेक जिहादींना अटक केली आहे. अल सफीर वृत्तपत्राने बगदादीच्या पत्नी व मुलाला झालेली अटक हा एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला, असे म्हटले आहे. सिरियातून लेबनॉनमध्ये बनावट कागदपत्रांसह अटक केली असून अल यार्झा येथे त्यांची चौकशी सुरू आहे. अल यार्झा शहर डोंगराळ भागात आहे. बगदादीची पत्नी व मुलाला झालेली अटक काही दिवस गुप्त ठेवण्यात आली होती. लेबनॉन व सिरियातील तणाव व नाजूक परिस्थिती यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
इसिस नेता बगदादीच्या पत्नीसह मुलाला अटक
By admin | Published: December 03, 2014 1:38 AM