ऑनलाइन लोकमत -
तस्मानिया (ऑस्ट्रेलिया), दि. २२ - लहान मुलांसाठी बाजारात मिळत असलेली अत्याधुनिक खेळणी त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतात. खेळणं म्हणून खरेदी करत असलेली वस्तू तुमच्या मुलाला काही इजा तर पोहोचवणार नाही ना ? हे पाहणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियामधील तस्मानिया येथे लेझर पॉईंटमुळे मुलाला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. ऑस्ट्रेलियामधील आरोग्य अधिका-यांनी पालकांना यासंबंधी चेतावणी दिली आहे.
चमकणारे लेझर पॉईंट खेळताना डोळ्यावर मारल्यामुळे तस्मानिया येथील एका मुलाला 75 टक्के दृष्टी गमवावी लागली आहे. या मुलाला गेल्या काही दिवसांपासून पाहण्यामध्ये त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या डॉक्टरांनी नेत्र चिकित्सक बेन यांना बोलावलं होतं. त्यांनी तपासणी केली असता लेझर पेन डोळ्यात मारल्याने हा त्रास झाल्याचं त्यांना जाणवलं.
मुलाला डोळ्यांत कोणत्याही प्रकारची वेदना होत नव्हती मात्र लेझर पेनमुळे डोळ्यावर लगेच परिणाम झाला आणि त्यामुळे दृष्टी गमावली असल्याची माहिती बेन यांनी दिली आहे. लेझर पेन डोळ्यात मारलं त्यावेळी मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र त्याच्या डोळ्यातील महत्वाचा भाग जळाला आहे. यामुळे त्याला कायमस्वरुपी अंधत्व येण्याची शक्यता आहे. मुलाला फक्त 25 टक्के दृष्टीसोबत आपलं उर्वरित आयुष्य घालवावं लागण्याची शक्यता आहे. पालकांनी अशाप्रकारचे लेझर पेन तसंच मुलांनी हानीकारक असलेली खेळणी विकत घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.