आयफोन लॉन्च झाल्यावर त्याच्या फीचर्सइतकीच चर्चा किमतीचीदेखील होते. १३ ऑक्टोबरला आयफोन १२ सीरिज लॉन्च झाली. या सीरिजच्या किमतीची मोठी चर्चा झाली. त्यावर बरेच मीम्स आले. आयफोन १२ खरेदी करण्याऐवजी त्याच किमतीत काय काय खरेदी करता येऊ शकेल, याची यादीदेखील सोशल मीडियावर फिरू लागली. आयफोन १२ विकत घेण्यासाठी किडनी विकावी लागेल, अशाही चर्चा झाल्या. आयफोनची नवी सीरिज लॉन्च झाल्यावर प्रत्येकवेळीही किडनी विकण्याची चर्चा होते.आयफोन घ्यायचा तर किडनी विकावी लागणार, ही गोष्ट सगळेच विनोद म्हणून घेतात. मात्र ९ वर्षांपूर्वी अशीच एक घटना चीनमध्ये घडली होती. ऍपलची दोन उत्पादनं खरेदी करण्यासाठी वँग शांगकू नावाच्या तरुणानं त्याची किडनी विकली होती. किडनी विकली, त्यावेळी वँगचं वय १७ वर्ष होतं. काळ्या बाजारात त्यानं किडनी ३ हजार २७३ अमेरिकन डॉलर्सना विकली. या पैशातून त्यानं आयफोन ४ आणि आयपॅड २ खरेदी केले.वँगला आयफोन खरेदी करायचा होता. मात्र त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याचवेळी तो अवयवांचा काळा बाजार करणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला. किडनीसाठी २० हजार युआन (३ हजार अमेरिकन डॉलर) मिळत असल्याचं त्या व्यक्तीनं वँगला सांगितलं. त्यानंतर वँगनं मध्य हुनान प्रांतात अवैधपणे शस्त्रक्रिया केली. त्याची उजवी किडनी काढण्यात आली.वँगवर झालेल्या शस्त्रक्रियेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याची वँगची अवस्था अतिशय वाईट आहे. तो डायलिसिसवर आहे. आयुष्यभर त्याला अंथरुणातच राहावं लागणार आहे. अवैध शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही महिन्यांतच वँगच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला. त्याची अवस्था गंभीर होऊ लागली. तो अंथरुणाला खिळला. त्याला दररोज डायलिसीसची गरज भासू लागली.वँगची अवस्था पाहून त्याच्या आईला संशय आला. तिनं बरीच विचारणा केल्यानंतर वँगनं घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आली.
आयफोनसाठी ९ वर्षांपूर्वी किडनी विकलेला 'तो' सध्या काय करतो?; वाचून धक्का बसेल
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 5:17 PM