वॉशिंग्टन: आपल्यावर सतत टीकेची झोड उठविणारी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ही दोन प्रभावशाली दैनिके ‘तद्दन बनावट बातम्या देणारी वृत्तपत्रे’ आहेत, असा उघड आरोप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोणत्याही संघीय सरकारी कार्यलयात यापुढे ही दैनिके न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आपल्याला पसंत नसलेल्या माध्यमांवर ‘देशद्रोही’, ‘जनतेचे शत्रू’ अशा शेलक्या शब्दांनी टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी या दोन वृत्तपत्रांविषयीचा आपल्या मनातील आकस कधीच दडवून ठेवला नव्हता. फक्त आत्तापर्यंतच्या शाब्दिक संतापास आता त्यांनी सरकारी निर्णयाचे स्वरूप दिले आहे. पसंत नसलेले वृत्तपत्र विकत घेणे बंद करणे हे एरवी सामान्य वाचकांकडून घडतच असते. पण सरकार जेव्हा या भूमिकेत उतरते तेव्हा तो लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील संघर्षाचा विषय ठरतो.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी स्टेफनी ग्रिशाम यांनी एका निवेदनात हा निर्णय जाहीर करताना नमूद केले की, वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाइम्स ही दोन वृत्तपत्रे यापुढे व्हाईट हाऊसमध्ये घेतली जाणार नाहीत. संघीय सरकारच्या अन्य सर्व कार्यालयांनाही ही वृत्तपत्रे घेणे बंद करण्यास सांगण्यात येत आहे. यामुळे करदात्यांचे लाखो डॉलर वायफळ खर्ची पडणे वाचेल. ट्रम्प हे छापील वृत्तपत्रांसह एकूणच सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये येणाºया बातम्यांची अत्यंत चिकित्सकपणे बारकाईने दखल घेत असतात. त्यावर ते लगेच समाजमाध्यमांत पसंती वा नापसंतीच्या पोस्ट टाकत असतात. अनेक वेळा तर ते माध्यम प्रतिनिधींना त्यांच्याच बातम्यांच्या प्रिंटआऊटवर आपली हस्तलिखित टिपणी लिहूनही पाठवत असतात.
व्हाइट हाऊस वार्ताहर संघटनेचे अध्यक्ष जोनाथन कार्ल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, वृत्तपत्रांच्या निर्भिड पत्रकारितेला आपण किंमत देत नाही, असा कोणी आव आणल्याने त्या बातम्या नाहिशा होणार नाहीत. तसेच यामुळे सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे व लोकांना माहिती देण्याचे पत्रकारांचे कामही थांबणार नाही.आदेश जारी‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सोमवारी या दोन वृत्तपत्रांना सरकारी कार्यालये बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्याचाच औपचारिक आदेश आता काढण्यात आला आहे. ट्रम्प हे छापील वृत्तपत्रांसह एकूणच सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये येणाºया बातम्यांची अत्यंत चिकित्सकपणे बारकाईने दखल घेत असतात.केनेडींवर झाली होती टीकायाआधी दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनीही सन १९६२ मध्ये ‘दी न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यून’ हे वृ्ृतपत्र बंद करून त्याएवजी व्हाईट हाऊसमध्ये ‘सेंट ल्युईस पोस्ट डिस्पॅच’ हे दैनिक घेण्याचा निर्णय घेतला होता.या ‘बालिश’ निर्णयावरून सर्वदूर टीका झाली.एका सेनेट सदस्याने केनेडींनी बंद केलेल्या वृत्तपत्राची वर्षाची वर्गणी भरून ती त्यांना भेट म्हणून पाठविली व नंतर त्यांनी ‘तुम्हाला अमेरिकी जनतेने राजसिंहासनावर नव्हे तर राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर बसविले आहे’, याची केनेडींना काँग्रेसमध्ये स्पष्ट जाणीव करून दिली. अर्थातच तो निर्णय केनेडींना रद्द करावा लागला होता.