नवी दिल्ली - सापाला पाहिलं तर भल्याभल्यांची झोप उडते. मात्र अमेरिकेतील एका महिलेने स्वत:चा जीव धोक्यात घालून एका सापाला जीवदान दिलं आहे. सापाला वाचविण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रोजा फॉन्ड असं या धाडसी महिलेचं नाव आहे. फॉन्डने हा व्हिडीओ तिच्या फेसबुकवर अपलोड केल्यानंतर सोशल मिडीयात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
फ्लोरिडा येथे राहणारी रोजा फॉन्ड ही काही दिवसांपूर्वी कारने ब्रक्सविले याठिकाणी जात असताना वाटेत तिला रस्त्याच्या कडेला पडलेल्या बीअरच्या कॅनवर तिची नजर पडली. या बीअरच्या कॅनमध्ये एका साप अडकल्याचं दिसून आलं. सापाचे तोंड बीअरच्या कॅनमध्ये अडकल्याने सापाचा जीव धोक्यात आला होता. रोजा फॉन्डने हे पाहिल्यानंतर तात्काळ गाडी बाजूला घेत सापाला वाचविण्यासाठी पुढे सरसावली. बीअर कॅनमध्ये अडकलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी रोजा फॉन्डने अनेक प्रयत्न केले. सापाला बाहेर काढताना तिच्या मनात भिती होती मात्र सापाला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं हे रोजाने मनाशी ठाम केलं होतं. रोजा फॉन्ड ही प्राणी बचाव संघटनेसाठी कामदेखील करत असल्याची माहिती आहे.
रोजा फॉन्डने सांगितले की, जेव्हा मी सापाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी तिथे दोन कुत्रे होते. ते कुत्रे या सापाला मारण्याचा प्रयत्न करत होते. सापाला वाचविण्यासाठी माझ्याकडे कोणतंही साहित्य नव्हते. त्यामुळे एका झाड्याच्या फांदीचा वापर करत मी बीअर कॅनमधून सापाला बाहेर काढण्यासाठी धडपड करत होते.
त्याचसोबत सापाविषयी मला कोणतंही ज्ञान नाही मात्र त्या सापाला मला वाचवायचे होते हे मी ठरवलं. जेव्हा मी सापाला बाहेर काढत होते तेव्हा दोन वेळा त्याने माझ्या हाताला विळखा घेतला. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते. मी जोरात ओरडले. काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेर मला सापाला वाचविण्यात यश आले. हा साप रेसर प्रजातीचा आहे. या सापामध्ये विष नसते. अमेरिकेच्या अनेक भागात हा साप आढळून येतो.