रियो दी जानेरो - जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असताना वर्षभराने पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन ताकदवर स्ट्रेन हातपाय पसरू लागला आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. मृत्यूंची संख्या रुग्णांच्या मानाने कमी आहे. मात्र ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे एका दिवसात 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही तेथील पहिलीच वेळ आहे. गेल्या काही आठवड्यांपासन ब्राझीलने जगभराच्या चिंता वाढविल्या असून प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठी वाढ असल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी ब्राझीलमध्ये 3251 लोकांचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या सर्वाधिक लोकसंख्येचा राज्यामध्ये साओ पावलोमध्ये सर्वाधिक 1021 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये येथे 713 लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने ब्राझीलच्या आरोग्य प्रणालीवरील ताण देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक रुग्णालयामध्ये आयसीयू बेडची कमतरता भासू लागली आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 3,00,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत अमेरिकेनंतर आता ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 11 कोटींवर असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 15 भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी याआधी लागू झालेल्या लॉकडाऊनपेक्षा या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत असं म्हटलं आहे. तसेच या लॉकडाऊनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावाच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'या' छोट्याशा देशाची कमाल! प्रत्येकाला मिळाली कोरोना लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश
एका छोट्या देशाने कमाल केली आहे. आपल्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे. लसीकरण पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच देश ठरला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जिब्राल्टरमधील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचा डोस देण्यात आला आहे. जिब्राल्टरची लोकसंख्या जवळपास 33,000 आहे. या ठिकाणी कोरोनाचे चार हजार 263 रुग्ण आढळून आले होते. तर देशातील 94 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मॅट हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना "मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे" असं म्हटलं आहे.