ब्राझीलच्या (Brazil) संसदेत मोठी घटना घडली आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांच्या समर्थकांनी संसद भवनात गोंधळ घातला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच, शेकडो निदर्शकांना अटक करण्यात आली. मात्र, यानंतरही आणखी काही निदर्शकांनी सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनात घुसून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलची राजधानी ब्रासिलियामध्ये (Brasilia) रविवारी बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टात गोंधळ घातला. जवळपास तीन हजार लोकांचा जमाव संसद परिसराबाहेर जमला आणि त्यानंतर त्यांनी बॅरिकेड तोडून भवनात प्रवेश केला. दरम्यान, ब्रासिलियामध्ये बोल्सोनारो यांचे अनेक समर्थक संसद भवनाच्या छतावर चढले आणि बॅनर घेऊन छतावर बसले. यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात बोल्सोनारो समर्थक ब्राझीलच्या संसदेत गोंधळ घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, बोल्सोनारो समर्थकांच्या बॅरिकेड तोडण्याच्या घटनेनंतरच मोठा पोलिस फौजफाटा संसद भवनात पोहोचला. पोलिसांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी शेकडो निदर्शकांना अटकही करण्यात आली.
ब्राझीलचे विद्यमान राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला डा सिल्वा यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसद भवनात गोंधळ घालणाऱ्या निदर्शकांवर कारवाई केली जाईल, असे लुईझ इनासिओ लुला डा सिल्वा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. दरम्यान, ब्राझीलमधील गोंधळाने जगाला पुन्हा एकदा कॅपिटल हिलची आठवण करून दिली आहे.
या घटनेवर अमेरिकेने व्यक्त केली नाराजीब्राझीलमधील या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्राझीलमधील लोकशाही आणि सत्तेच्या हस्तांतरणावरील हल्ल्याचा मी निषेध करतो.आम्ही ब्राझीलच्या लोकशाही संस्थांना पूर्ण पाठिंबा देतो आणि ब्राझीलच्या लोकांच्या इच्छेला कमी लेखता येणार नाही. मी राष्ट्रपती सिल्वा यांच्यासोबत काम करत राहण्यास उत्सुक आहे, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे.