ब्राझीलला (Brazil) मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 94 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सकाळी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका पेट्रोपोलीस या ठिकाणाला बसला आहे, जिथे मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
महापौर रुबेन्स बोम्टेम्पो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृतांची संख्या वाढू शकते. आतापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. वेगाने मदतकार्य सुरू आहे". याआधी 2011 मध्येही या भागात अतिवृष्टी झाली होती. पावसामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी मदत आणि बचाव कार्यादरम्यान, 49 वर्षीय रोसलिन विर्गिलिओ यांना अश्रू अनावर झाले. कारण ती ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेच्या वेदना विसरू शकले नाहीत. अडकलेल्या महिलेला ते वाचवू शकले नाहीत.
"युद्धासारखी परिस्थिती"
"काल एक महिला मदतीसाठी ओरडत होती. मला इथून बाहेर काढा. पण, आम्ही काहीच करू शकलो नाही. पाणी आणि मातीचा ढिगारा खूप होता. दुर्दैवाने आमचे शहर उद्ध्वस्त झालं आहे" असं ते म्हणाले. गव्हर्नर क्लॉडियो कास्त्रो यांनी पत्रकारांना सांगितले की ही युद्धासारखी परिस्थिती आहे आणि बाधित भागातील ढिगारा साफ करण्यासाठी त्यांना शेजारील राज्यांकडून अवजड यंत्रसामग्रीसह सर्व शक्य मदत मिळत आहे. राज्याच्या अग्निशमन विभागाने मंगळवारी उशिरा एका निवेदनात सांगितले की, बचाव कार्यात 180 सैनिकांचा समावेश आहे.
80 हून अधिक घरं वाहून गेली असून अनेक जण बेपत्ता
जवळपास 80 हून अधिक घरं वाहून गेली असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. लोकं आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या परिसरात एका दिवसात तीन तासांत 25.8 सेंटीमीटर पाऊस झाला, जो मागील 30 दिवसांच्या पावसाइतकाच आहे, असं म्हटलं आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी ट्विट केले की, त्यांनी आपल्या मंत्र्यांना पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.