ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) हे उचक्यांनी हैराण झाल्याची घटना समोर आली आहे. बोल्सोनारो यांना गेल्य़ा 10 दिवसांपासून सतत उचक्या लागत आहेत. या उचक्या थांबत नसल्याने त्यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्सोनारो यांच्या आतड्यांमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने त्यांना हा त्रास होत आहे. तसेच डॉक्टरांनी बोल्सोनारो यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता असल्याचं देखील म्हटलं आहे.
ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय बोल्सोनारो यांना उपचारासाठी राजधानी ब्रासीलीया येथील 'आर्म्ड फोर्सेस हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ही ठीक आहे. डॉक्टर त्यांच्या उचकीवरील समस्येवर उपचार करत आहेत. ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदाच्या 2018 मधील निवडणूक प्रचारादरम्यान बोल्सोनारो यांच्या पोटावर वार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्जनने त्यांना साओ पाओलोमधील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
नोवा स्टार रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींवर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही. बोल्सोनारो यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रुग्णालयातील छायाचित्र पोस्ट केले. 2018 मध्ये प्रचारादरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आतड्यांना इजा झाली होती. त्यावेळी शस्त्रक्रियाही करण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्यांना कार्यक्रमांमध्ये बोलताना त्रास जाणवत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.