भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) आता इतिहास रचत ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक यांनी पेनी मोरडॉन्ट यांना पराभूत करत विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांना 180 हून अधिक खासदारांचे समर्थन मिळाले, तर पेनी मोरडॉन्ट या समर्थनाच्या बाबतीत फार मागे पडल्या हेत्या. यानंतर, त्यांनी आपले नाव मागे घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार, ऋषी सुनक 28 ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात.
ब्रिटनमध्ये 45 दिव पंतप्रधान पदावर राहिलेल्या लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात आली होती. यात सुरुवातीपासूनच ऋषी सुनक यांना एक प्रबळ दावेदार मानले जात होते.
महत्वाचे म्हणजे, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमावारी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून स्वतःहून माघार घेतली होती. तेव्हा ही निवडणूक ऋषी सुनक जिंकतील हे जवळपास निश्चित झाले होते. खरे तर ब्रिटनच्या संपूर्ण राजकारणासाठी हा एक मोठा दिवस आहे. कारण गेल्या तीन महिन्यांत ऋषी सुनक असे तिसरे व्यक्ती आहेत, जे देशाचे पंतप्रधान होत आहेत.
सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर लिझ ट्रस ऋषी सुनक यांचा पराभव करत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या. मात्र, त्यांनाही फारकाळ सत्तेवर राहता आले नाही आणि 45 दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. यानंतर, ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आणि त्यांना विजयही मिळाला. खरे तर, ऋषी सुनक यांचा विजय भारतासाठी दिवाळी गिफ्ट पेक्षा कमी नाही.