नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजुने निकाला लागला आहे. याबाबत, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती आजच्या निकालात महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाचे मनपूर्वक स्वागत असेही सुषमा यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने 15/1 अशा मतांनी विजय मिळवला आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचा आदेश आयसीजेने दिला आहे.
कुलभूषण जाधव प्रकरणात भारताच्या बाजुने निकाल लागला आहे. त्यानुसार, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. या निकालानंतर सुषमा स्वराज यांनी भारताचे वकिल हरिश साळवे यांचेही आभार मानले असून आपण अतिशय प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली. त्यामुळेच, याप्रकरणी भारताला विजय मिळाल्याचे म्हटले. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे कुलभूषण यांचे कुटुंब नक्कीच आनंदी असेल, असेही स्वराज यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात तत्कालीन परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. या निकालामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली २०१६ साली मार्च महिन्यात पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर तेथील लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. तीन दिवसांपुर्वी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळेस या दोघींवर अनेक बंधने घालण्यात आली होती. बांगड्या, मंगळसूत्र आणि पादत्राणेही काढून तेही काचेच्या पलिकडे बसून भेटण्याची परवानगी देण्यात आली. तसेच मराठीतून बोलण्यासही मनाई करण्यात आली होती. कुलभूषण यांच्या आईला तेथील माध्यमांनी अपमानास्पद प्रश्नही विचारले होते.