दक्षिण कोरियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लिथिअम आयन बॅटरी बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याने २१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. योनहॅप न्यूज एजन्सीने याचे वृत्त दिले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे दहाला ही आग लागली.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये ही फॅक्टरी आहे. द. कोरियाची प्रमुख बॅटरी निर्माता कंपनी एरीसेल या कंपनीच्या फॅक्टरीला आग लागली आहे. लिथिअम आयनने पेट घेतल्याने राखाडी रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे अग्निशमन दल आतमध्ये जाण्यास असमर्थ होते.
"अजूनही आत जाऊन बचाव कार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आग आटोक्यात आल्यावर आम्ही प्रयत्न करू ," असे अग्निशमन दलाचे जवान किम जिन-यंग यांनी सीएनए या वृत्तसंस्थेला सांगितले. कंपनीत किती कामगार होते याची माहिती मिळू शकलेली नाही. कंपनीने दिलेल्या लिस्टनुसार त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
गोदामातील बॅटरी सेलचा स्फोट झाला आणि ही आग पूर्ण कंपनीत पसरली. या ठिकाणी जवळपास ३५ हजार बॅटरी युनिट होत्या. या सर्व बॅटरी जळाल्या आहेत.