न्यूयॉर्क : ब्रेक्झिट जगाच्या हिताचे नाही, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे. ब्रेक्झिटनंतर भारताला युरोप आणि ब्रिटन यांच्यासोबतच्या व्यापाराबाबत फेरतपासणी आणि फेरचर्चा करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.न्यूयॉर्कमधील मेट्रोपोलिटन कला दालनाचे मुख्य डिजिटल अधिकारी श्रीनिवासन यांच्याशी लाईव्ह फेसबुक गप्पा मारताना भट्टाचार्य यांनी वरील विधान केले. त्यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे आम्हाला खूप फायदा आहे, असे मला वाटते. ब्रेक्झिटमुळे जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेला खीळ बसणार आहे. ब्रेक्झिट जगाच्या अजीबात हिताचे नाही. सध्या जग अधिक चांगल्या पद्धतीने जोडलेले आहे आणि हेच सर्वांसाठी चांगले आहे. न्यूयॉर्कमध्ये असलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांनी पुढे म्हटले की, ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीनंतर भारताला युरोप आणि ब्रिटनसोबत व्यापार कसा सुरू ठेवायचा यावर भारताला फेरतपासणी आणि फेरवाटाघाटी कराव्या लागतील. हे भारतासाठी काही चांगले असणार नाही. ब्रेक्झिटचा एसबीआयच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही. सध्या ब्रिटनमध्ये बँकेच्या १२ शाखा आहेत. या शाखा विशिष्ट स्वरूपाचे कामकाज पाहतात. एक शाखा ‘होलसेल आॅपरेशन’ पाहते. तिचे काम थोडे मंदावू शकते. तथापि, ब्रिटनने युरोपीय संघामधून बाहेर पडणे हा तेथील समस्यांवरचा उपाय होऊ शकत नाही. गेल्या महिन्यात भट्टाचार्य यांनी ब्रेक्झिटमुळे भारताचा लाभ होईल, असे वक्तव्य केले होते. एका निवेदनात त्यांनी सांगितले होते की, भांडवली बाजारात काही प्रमाणात पीछेहाट होईल. अन्य देशांप्रमाणेच भारतावरही त्याचा परिणाम होईल. तथापि, व्यापारविषयक धोरणात फेरबदल होणार असल्याने भारताला युरोप व ब्रिटनमध्ये अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. (वृत्तसंस्था)
ब्रेक्झिट जगाच्या हिताचे नाही
By admin | Published: July 06, 2016 2:05 AM