प्रेमभंग झाल्यावर अनेकजण नैराश्य, चिंता यांसारख्या समस्यांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी न्यूझीलंड सरकारनेच पुढाकार घेतला असून ‘लव्ह बेटर कॅम्पेन’ सुरू केले आहे. याद्वारे तरुणाईला ब्रेकअपमधून सावरण्यासाठी सरकारी मदत मिळेल. न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाच्या मंत्री प्रियांका राधाकृष्णन यांच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात सुमारे ३० कोटी रुपयांहून अधिक भरभक्कम तरतूद जाहीर केली आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या उदयामुळे प्रेमभंगामध्ये अनोखी आणि गुंतागुंतीची गतिशीलता आली आहे. प्रेमभंगातून सावरण्यासाठी मदतीची गरज असल्याचे १२०० पेक्षा जास्त तरुणांनी सांगितले. ब्रेकअप ही तरुणाईसमोरची महत्त्वाची समस्या आहे, असे प्रियांका यांनी सांगितले. फेसबुकवर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. या मोहिमेद्वारे अशा तरुणांची काळजी घेतली जाणार आहे. कुटुंबातील जबाबदार सदस्य बनण्याचे, प्रेमभंगाला सामोर जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.