नवी दिल्ली-
गुदाशयाच्या कर्करोगावर औषध सापडल्यानंतर आता तज्ज्ञांनी स्तनाच्या कर्करोगाबाबत नवं संशोधन केलं आहे. ज्यामुळे स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये ५ जून रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या अॅडव्हान्स स्टेजमधील रूग्णांची जगण्याची क्षमता सुधारण्यासाठी एक नवीन औषध सापडलं आहे.
ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन नावाचं औषध कर्करोगाच्या सेल शोधण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या अँटीबॉडी केमोथेरेपीच्या माध्यमातून कॅन्सर सेलपर्यंत पोहोचविण्याचं काम करतं.
ऐतिहासिक यश! कॅन्सर नाहीसा करणारा फॉर्म्युला सापडला?, चाचणीनंतर काही रुग्ण कॅन्सरमुक्त
न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरसह अनेक कर्करोग संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या मोठ्या गटानं स्तनाचा कर्करोग असलेल्या आणि कर्करोगाचे सेल्स शरीराच्या इतर भागात पसरलेल्या ५५७ रुग्णांवर औषधाची चाचणी घेतली. संशोधकांना आढळून आलं की केमोथेरपीपेक्षा दुप्पट वेगानं ट्यूमरची वाढ होण्यापासून रोखण्यात औषध यशस्वी ठरत आहे. परिणामी शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णांचं आयुष्य आणखी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी वाढतं असं म्हणता येईल. केमोथेरपी घेतलेल्या रुग्णांच्या १६.८ महिन्यांच्या तुलनेत औषध घेतलेले रुग्ण जवळजवळ दोन वर्षे अधिक जगले असं अभ्यासात आढळून आलं आहे.
सामान्यतः या उपचारांचा उद्देश जीवनाचा दर्जा सुधारणं किंवा त्यांचं जगण्याचा कालावधी वाढवणं असा आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या ब्रेस्ट मेडिकल ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. हॅले मूर यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार रूग्णांच्या जीवनात अनेक महिने जोडणारा हा आजवरचा ऐतिहासिक क्षण आहे असं म्हणता येईल.
ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन औषधाचे निष्कर्ष देखील महत्त्वपूर्ण आहेत कारण औषधानं स्तनाच्या कर्करोगाच्या एका प्रकारावर काम केलं ज्यावर उपचार करणं खूप अवघड आहे. कर्करोगावरील उपचार सामान्यत: HER2 नावाच्या विशिष्ट प्रकारच्या उत्परिवर्तित प्रथिनांना ब्लॉक करून कार्य करतात. पण कर्करोगाच्या अनेक प्रकरणांमध्ये कर्करोगाच्या पेशींमध्ये प्रथिनं कमी प्रमाणात असतात याचा अर्थ त्यांना ब्लॉक करणं प्रभावी ठरत नाही.
ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन औषध इतर कर्करोगाच्या औषधांप्रमाणे कर्करोगाच्या सेल्सना HER2 द्वारे लक्ष्य करतं परंतु संशोधकांच्या मते प्रथिनांची पातळी कमी असली तरीही ते जवळपासच्या कर्करोगाच्या सेल्स नष्ट करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या औषधाचं महत्व वाढतं. औषधाचे दुष्परिणाम आहेत पण ते पारंपारिक केमोथेरपीसारखेच आहेत, जसं की मळमळ, थकवा आणि केस गळणं असं अभ्यासात आढळून आलं आहे. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांचं नुकसान देखील अनुभवलं आहे आणि अतिशय कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जोखीम कमी करण्यासाठी साइड इफेक्ट्स आणि इतर गोष्टींवर लवकरात लवकर मार्ग काढणं महत्वाचं असल्याचं संशोधकांनी नमूद केलं आहे.