नवी दिल्ली - आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. १०० पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स काऊन्सिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ब्रिक्स बिझनेस काऊन्सिलने दहा वर्षांत आमचे आर्थिक सहकार्य वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा २००९ मध्ये ब्रिक्सची पहिली परिषद झाली, तेव्हा जग मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर येत होते. या काळात ब्रिक्स हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचा नवा किरण म्हणून उदयास आला होता. कोविड महामारी, तणाव आणि युद्ध यामुळे जग आर्थिक आव्हानांमधून जात आहे. अशा वेळी ब्रिक्स देशांची महत्त्वाची भूमिका आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथीनंतरही भारत आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आम्ही लवकरच ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा देश बनू असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
तर येत्या काही वर्षात भारत जागतिक आर्थिक सुधारणेत पुढे असेल कारण आम्ही आपत्कालीन आणि कठीण परिस्थितीत सुधारणेबाबत संधीत परिवर्तन केले आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही मिशन मोडमध्ये केलेल्या बदलांमुळे व्यवसाय करण्याच्या सुलभतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही रेड टेप हटवून रेड कार्पेट अंथरलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
थेट लाभ हस्तांतरणाचा उल्लेख
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील करोडो लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) केले जाते. आतापर्यंत अशा प्रकारे ३६० अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढली आणि भ्रष्टाचार कमी झाला. आज भारतात UPI चा वापर रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत केला जातो. भारत हा जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे. UAE, फ्रान्स आणि सिंगापूर सारखे देश या प्लॅटफॉर्मशी जोडले आहेत. ब्रिक्स देशांसोबतही यावर काम करण्याच्या अनेक शक्यता आहेत. भारतातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्यामुळे देशाची परिस्थिती बदलत आहे. आम्ही या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १२० अब्ज डॉलरची तरतूद ठेवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं स्वागत
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी मंगळवारी (२२ ऑगस्ट) जोहान्सबर्गला पोहोचले. येथे पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. २०१९ नंतर आफ्रिका ब्रिक्स देशांच्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) पहिल्या थेट शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. प्रिटोरिया हिंदू सेवा समाज आणि BAPS स्वामीनारायण संस्थानच्या स्थानिक युनिटच्या कार्यकर्त्यांसह भारतीय समुदायाने मोठ्या संख्येने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.