शियामेन, दि. 4 - चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी चीनमध्ये दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. तांग युआंगई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. भारतीय पत्रकारांसोबत तांग युआंगई ब्रिक्स परिषदेचे वार्तांकन करत होती. त्यावेळी उपस्थित भारतीय पत्रकारांनी तिला विचारले की, तुम्हाला हिंदी भाषा बोलता येते का, यावर ती म्हणाली, थोडी-थोडी येते. यावेळी पत्रकारांनी तिला हिंदी चित्रपटातील एखादे आवडीचे गाणे गाण्याची विनंती केली, त्यावर तिने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नूरी' या चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय 'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा' हे गाणे गायिले. वृत्तसंस्था एएनआयसोबत बातचीत करताना तांग युआंगई हिने सांगितले की, भारताविषयी मला खूप प्रेम आहे. भारतातील एका विद्यापीठातून हिंदी भाषा अवगत केली आहे. तसेच, भारतातील अनेक लोकांसोबत मी प्रवास केला आहे. भारतीय लोकांना भेटल्यानंतर मला समजते की, भारतीय लोक जास्त इमानदार आणि चांगले असतात. यामुळेच मला भारताविषयी जास्त प्रेम वाटते.
दरम्यान, पाच दिवसांच्या ब्रिक्स परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये काल (दि.3) दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच, नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे तज्ञ सांगत आहेत.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.- आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.