शियामेन (चीन), दि. 4 - चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या एक दिवसापूर्वी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ''ब्रिक्स देशांनी आपसातील मतभेद बाजूला सारुन एकमेकांच्या प्रश्नांचा विचार करत विश्वास तसेच धोरणात्मक संपर्क वाढवावा'', असे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. ब्रिक्स राष्ट्र जागतिक शांततेसंबंधी वचनबद्ध असल्याचेही ते म्हणालेत. भारत-चीनदरम्यान तब्बल 73 दिवस चाललेल्या डोकलाम विवाद आणि उत्तर कोरियानं नुकतेच केलेल्या दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बच्या केलेल्या परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर क्षी जिनपिंग यांचे हे विधान महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, चीनने इजिप्त, केनया, ताजिकिस्तान, मेक्सिको आणि थायलंड यांनाही परिषदेसाठी बोलाविले आहे. तब्बल ७३ दिवस चीनबरोबर भारताचा डोकलाम येथे वाद सुरू होता. तो मिटल्यानंतर मोदी यांचा हा शिखर परिषदेसाठीचा प्रथमच चीन दौरा आहे. ब्रिक्सबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, ‘या शिखर परिषदेनिमित्त नेत्यांना द्विपक्षीय पातळीवर भेटण्याची संधी आहे.’ ब्रिक्सच्या भूमिकेला भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. प्रगती आणि शांततेसाठी ब्रिक्स देशांच्या स्थापन झालेल्या भागीदारीने दुस-या दशकात प्रवेश केला आहे.
2 महिने सुरू होता लष्करी तिढा भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून,त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही घोषणा केली होती. सैन्याची ही माघार उभयपक्षी सहमतीने होत असल्याचे भारताने म्हटले असले तरी चीनने मात्र भारताने एकतर्फी सैन्य मागे घेतल्याचा दावा केला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी याविषयी अधिक तपशील देण्यास नकार दिला. मात्र सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली आहे व त्यानुसार सैन्य मागे घेतले जात आहे, यास या सूत्रांनी दुजोरा दिला. बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्रालय, ‘पीपल्स डेली’ व ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्था तसेच चायना ग्लोबल टेलिव्हिजन या सर्वांनी डोकलामचा तिढा सोडवण्यावर द्विपक्षीय सहमती झाल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त भारताने सैन्य मागे घेतले आहे. सोमवारी दुपारपर्यंत डोकलाम येथून भारताने आपले सर्व सैनिक व लष्करी सामग्री माघारी घेऊन सीमेपलीकडे नेल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले. चीन मात्र या प्रदेशावरील आपले सार्वभौमत्व अधोरेखित करण्यासाठी तेथे सैन्य ठेवून पहारा देतच राहील, असा दावाही त्यांनी केला.
काय होता नेमका वाद?या सीमेवर भूतानच्या मदतीसाठी भारतीय सैन्य तैनात आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी भूतानच्या हद्दीत सुरू केलेले रस्त्याचे बांधकाम भारतीय सैनिकांनी हस्तक्षेप करून 18 जून रोजी बंद पाडले तेव्हापासून हा तिढा सुरू आहे. तो प्रदेश आपलाच असल्याचा दावा करून चीनने भारतावर घुसखोरीचा आरोप केला होता. तेव्हापासून भारताचे 350 व चीनचे 300 सैनिक डोकलाम पठारावर आमने-सामने आहेत.