बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मात्र या सत्तांतरानंतरही बांगलादेशमधील आंदोलकांचा आक्रोश शांत झालेला नाही. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांसह आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेख हसिना यांना भारतातून माघारी आणलं पाहिजे, तसेच त्यांच्यावर खटला चालवून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
बांगलादेशमधील आंदोलक हे शेख हसिना यांच्यावर खटला चालवला पाहिजे अशी मागणी करत आहेत. शेख हसिना यांना भारतात परत आणलं पाहिजे. शेख हसिना यांना बांगलादेशात परत पाठवा, अशी आमचाी भारताच्या पंतप्रधानांकडे मागणी आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले.
आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, आमची लढाई केवळ भ्रष्टाराचाराच्या विरोधात होती. आम्ही आधीही हिंदूंसोबत मिळून मिसळून राहत होतो आणि यापुढेही राहू. बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी हिंदूंच्या संरक्षणाची ग्वाही दिली होती. शेख हसिना यांच्या हुकूमशाहीच्या दीड दशकांच्या कार्यकाळादरम्यान देशातील प्रत्येक संस्था नष्ट करण्यात आली. निवडणुकांमध्येही स्पष्टपणे गडबड झाली, असा दावाही युनूस यांनी केला. दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात ढाका येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर बांगलादेशमधील आंदोलनादरम्यान, दोन लोकांच्या हत्येप्रकरणी दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत.