अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण 23 कर्मचारी असून यामध्ये भारतीय नागरिकही आहेत, असे इंग्लंडने प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे.
इराणच्या गार्डनी त्यांच्या वेबसाईटवरही ही माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले की, या जहाजाला आंतरराष्ट्रीय जलमार्ग कायदे न पाळल्याने जप्त करण्यात आले आहे. या जहाजाला इराणच्या बंदरावर ठेवले जाणार आहे. इंग्लंडचे सरकार किंवा जहाजाच्या कंपनीचा अद्याप जहाजाशी संपर्क झालेला नाही.
इराणला या कृत्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतीलइंग्लंडने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून इराणला इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी सांगितले की, इराणने जर लवकरात लवकर जहाज सोडले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमचे राजदूत इराणसोबत संपर्कात आहेत.