बियारिट्झ : अॅमेझॉनमधील पर्जन्य जंगल (रेनफॉरेस्ट) पुन्हा निर्माण करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी १० दशलक्ष पौंड (१२.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) देण्याची सोमवारी घोषणा केली. या जंगलाची आगीमुळे मोठी हानी झाली असून, जगभर त्याबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. आगीमुळे ज्या भागांचे नुकसान झाले त्यांच्यासह जंगल निर्माण करण्यासाठी ताबडतोब हा पैसा उपलब्ध केला जाईल, असे ब्रिटिश सरकारने येथे जी सेव्हन शिखर परिषदेत निवेदनात म्हटले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी रविवारी म्हटले होते की, जंगलाला लागलेल्या आगीमुळे ज्या देशांवर परिणाम झाला त्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी जगातील नेत्यांनी तयारी दर्शवली आहे. एका आठवड्यात अॅमेझॉनचे पर्जन्य जंगल डोळ्यांदेखत जळून जाताना पाहिले. निसर्गाच्या होत असलेल्या हानीकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही, असे जॉन्सन म्हणाले. जी ७ देशांच्या नेत्यांची शिखर परिषद सोमवारी अॅमेझॉनमधील जंगलाला लागलेल्या आगीसह जागतिक प्रश्नांवर चर्चा करून संपली; परंतु तिच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार युद्ध आणि जी सेव्हन गटाच्या ऐक्याचा निर्माण झालेला प्रश्न यांची सावली पडलेली होती. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद झरीफ हे इराणच्या वादग्रस्त ठरलेल्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून जी राजनैतिक कोंडी निर्माण झाली आहे तिच्यावरील चर्चेत संतापले.
अॅमेझॉनचे ६० टक्के जंगल हे ब्राझिलमध्ये असून, त्याचा काही भाग हा बोलिव्हिया, कोलंबिया, एक्युअडोर, फ्रेंच गुयिआना, गुयाना, पेरू, सुरिनाम आणि व्हेनेझुएलात आहे.