लोकमत न्यूज नेटवर्कलंडन : कर्जाच्या बोज्याखाली दबलेला फरारी भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. स्टेट बॅँकेच्या नेतृत्वाखाली अन्य बॅँकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने स्थगित केली आहे. बॅँकांनी मल्ल्या याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.उच्च न्यायालयाच्या दिवाळखोर घोषित करण्याच्या शाखेचे न्यायमूर्ती मायकेल ब्रिग्ज यांनी मल्ल्याविरूद्ध दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणी स्थगित केली आहे. मल्ल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तसेच कर्नाटकच्या उच्च न्यायालयात आपणास बॅँकांची कर्जे परत करण्यासाठी वेळ द्यावा अशा याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिका सध्या प्रलंबित असून, त्यांचा निकाल लागू द्यावा त्यानंतरच बॅँकांनी ब्रिटिश उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करता येऊ शकेल, असे न्यायमूर्ती ब्रिग्ज यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे. दिवाळखोरी जाहीर करण्यासाठीची याचिका ही असामान्य प्रकारातली असते. भारतीय न्यायालयात याबाबतचे दावे प्रलंबित असताना बॅँकांनी अशी घाई करणे योग्य नसल्याचे मत न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात व्यक्त केले आहे.भारतीय स्टेट बॅँकेच्या नेतृत्वाखालील बॅँकांच्या समूहाने मल्ल्या याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मल्ल्या दिवाळखोर जाहीर झाल्यास त्याच्याकडे असलेल्या १.१४५ अब्ज पाऊंडाच्या कर्जाची वसुली करणे बॅँकांना शक्य होणार आहे.भारतातील न्यायालयांमध्ये याचिका प्रलंबितफरारी झालेला उद्योगपती मल्ल्या याने भारतीय सर्वोच्च न्यायालयात आपण बॅँकांचे पैसे देण्यास तयार असून, त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्याने कर्नाटकच्या उच्च न्यायालयात एक याचिका करून बॅँकांची कर्जे परत करण्यासाठीची एक योजना मंजुरीसाठी सादर केली आहे. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी अद्याप सुरू आहे.मल्ल्याच्या नावावर जगभर विविध ठिकाणी मालमत्ता आहेत. त्यामध्ये फ्रान्समधील एक व्हिला, ब्रिटनच्या व्हर्जिन बेटांवर असलेल्या विविध मालमत्ता, कॅरेबियन देशात असलेला एक ट्रस्ट तसेच माल्टामध्ये असलेली इंडियन एम्प्रेस ही सुपर यॉट आदी मालमत्तांची यादी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात बॅँकांतर्फे सादर करण्यात आली आहे.
विजय मल्ल्याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:18 AM