लंडन : युरोपीय संघाचे ४७ वर्षे सदस्य राहिल्यानंतर ब्रिटन अखेर युरोपीय संघातून बाहेर पडला. युरोपीय संघातून बाहेर पडणारा युरोप हा पहिला देश आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.
२३ जानेवारी २०१३ रोजी तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी असे आश्वासन दिले होते की, जर त्यांचा पक्ष २०१५ च्या निवडणुकीत विजयी झाला, तर युरोपीय संघात राहायचे की बाहेर पडायचे, यावर जनमत घेतले जाईल. ७ मे २०१५ रोजी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने लेबर पार्टीवर विजय मिळविला आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळविले.
२३ जून २०१६ रोजी ब्रिटनने युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी ऐतिहासिक जनमत घेतले. ५२ टक्के लोकांनी बेक्झिटचे समर्थन केले. त्यानंतर डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. १३ जुलै २०१६ रोजी तेरेसा मे यांनी निवडणूक जिंकली आणि त्या पंतप्रधान झाल्या. १८ एप्रिल २०१७ रोजी तेरेसा मे यांनी ब्रिटनमध्ये मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली.
८ जून २०१७ रोजी तेरेसा मे यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत गमविले. १९ मार्च २०१८ रोजी ब्रिटन आणि युरोपीय संघाने ब्रिटनच्या वेगळे होण्याबाबत एक मसुदा प्रकाशित केला. मात्र, यावर सहमती होऊ शकली नाही. ८ जुलै २०१८ रोजी ब्रिटनचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी राजीनामा दिला. विदेशमंत्री बोरीस जॉन्सन यांनीही राजीनामा दिला.
१५ जानेवारी २०१९ रोजी संसदेने मे यांची ब्रेक्झिट योजना ऐतिहासिक मतदानाने असफल ठरविली. ७ जून २०१९ रोजी रोजी मे यांनी राजीनामा दिला. २३ जुलै रोजी बोरीस जॉन्सन नवे नेते आणि पंतप्रधान बनले. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी ब्रिटनने नवी ब्रेक्झिट योजना बनविली. २९ ऑक्टोबर २०१९ रोजी हाऊस ऑफ कॉमन्सने १२ डिसेंबरला निवडणुकांना मंजुरी दिली. १२ डिसेंबर २०१९ ला पंतप्रधान जॉन्सन यांनी सार्वत्रिक निवडणूक जिंकली. २३ जानेवारी २०२० रोजी ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर कायदा बनला. २९ जानेवारी २०२० रोजी युरोपीय संसदेने ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिली. ३१ जानेवारी २०२० ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय संघातून बाहेर पडले.