लंडन - गेल्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय नाट्यासारखेच नाट्य ब्रिटनमध्ये रंगले होते. सरकारमधील तब्बल ४१ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त स्काय न्यूज ने दिले आहे. तर बीबीसी न्यूज आणि रॉयटर्सने सांगितले की, बोरिस जॉन्सन हे पद सोडण्यासाठी तयार झाले आहेत. तसेच ते आज राजीनामा देऊ शकतात.
बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील तब्बल ४१ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाची खुर्ची हलली होती. वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर या बंडाला सुरुवात झाली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक मंत्र्याने राजीनामा दिला. आज राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या आकडा ४१ वर पोहोचला. त्यानंतर अखेर बोरिस जॉन्सन यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर या बंडाळीला सुरुवात झाली. मात्र दबावानंतरही जॉन्सन यांनी खंबीर राहत रिक्तपदांवर नियुक्ती करण्याचा धडाका लावत वित्त मंत्रीपदी नदीम जाहवी आणि आरोग्य मंत्रीपदी स्टीव्ह बर्कले यांची नियुक्ती केली होती.
जोपर्यंत नव्या पंतप्रधानांची निवड होत नाही तोपर्यंत बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदावर राहू शकतात. तर बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार नव्या पंतप्रधानांची निवड ही ऑक्टोबर महिन्यात होईल. तोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहू शकतात.